Home Featured News श्रमदान करून मनरेगाच्या कामगारांनी दिला नवा संदेश

श्रमदान करून मनरेगाच्या कामगारांनी दिला नवा संदेश

0
गोंदिया,दि.20 : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना या माध्यमातून आर्थिक मिळकतीत भर पडावा व काही प्रमाणात दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावे, हा त्यामागचा उद्देश्य आहे. मात्र या उद्देश्या पलिकडे जाऊन तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील  सुमारे ५६७ कामगारांनी एक संपुर्ण दिवस श्रमदान करून जिल्हा प्रशासनाला या श्रमदानातून काही तरी नवीन करता येऊ शकते, हा संदेश दिला आहे. या कार्याचे खंडविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी कौतुक केले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सेजगाव ग्रामपंचायत येथे खाजगी तलाव खोलीकरणाचे काम सुरू होते ते काम  संपल्यानंतर  ग्रामपंचायत सरपंच कंटीलाल पारधी यांनी कामावर उपस्थित मजुरांशी गावातील तलावाच्या पाळीवर असलेल्या मंदिर परिसरात एकदिवसाचे श्रमदान करण्याची माहिती दिली. तसेच तालुक्याचे खंडविकास अधिकारी जावेद इनामदार यांनाही या बद्दल माहिती दिली. या कामगारांनी श्रमदान करण्यासाठी एक मुखाने होकार दिला व लगेच दुसर्‍या दिवसी उपस्थित असलेल्या सुमारे ५६७ कामगारांनी संपुर्ण दिवस मंदिर व त्याला लागून असलेल्या तलावात श्रमदान करून त्या परिसराची संपुर्ण स्वच्छता केली. विशेष म्हणजे श्रमदानाचे कार्य बघण्यासाठी खंडविकास अधिकारी इनामदार यांच्यासह कनिष्ठ अभियंता गावात आले. त्यानंतर सर्व कामगारांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. विशेष म्हणजे तालुक्यातील पर्यटन स्थळाचा विकास केलास सेजगाव येथील तलाव व तलावाच्या पाळीवर असलेले मंदिराची सौंदर्यकरण केल्यास चांगला स्थळ या ठिकाणी निर्माण होऊ शकत असल्याचे मत इनामदार यांनी व्यक्त केले. तसेच प्रशासन स्तरावर या क्षेत्रासाठी कार्य करणार असल्याचेही सांगितले. मनरेगाच्या माध्यमातून कामगारांनी केलेला हा श्रमदान इतरांनाही एक संदेश देणारा ठरत आहे. त्याच्या या कार्याचे ग्रामपंचायत सरपंच  कंठीलाल पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन, ग्रामसेवक गौतम, सर्व ग्रा.पं.सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version