Home महाराष्ट्र आगीच्या ज्वाळातून बचावली बिबट्याची पिल्ले

आगीच्या ज्वाळातून बचावली बिबट्याची पिल्ले

0

भंडारा,दि.05ःःदुपारचे रखरखते उन. उसाच्या शेतात जन्मलेली बिबट्याची दोन गोंडस पिल्ले खेळण्यात मग्न होती. शेतातील तापलेल्या कचर्‍याचा चटका सहन करीत होती. तेवढय़ात वणवा पेटावा तसे उसाचे शेत पेटू लागले. आग विझविण्यासाठी वनमजुरांचा आटापिटा सुरू झाला. हा वणवा पिल्लांपर्यंत येईल आणि त्यांचा कोळसा करेल इतक्यात त्या पिल्लांना उचलण्यात आले आणि सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी मादी बिबट शेतात नव्हती. अन्यथा मोठे अघटीत घडले असते. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग कोका अभयारण्यालगत असलेल्या नवेगाव येथील शेतशिवारात बुधवारी दुपारी घडला.
दहा दिवसांपूर्वी नवेगाव येथील उसाच्या वाडीत एका मादी बिबट्याने दोन पिल्लांना जन्म दिला होता. उस कापणीला आल्याने शेतकर्‍यांनी उसाची कापणी सुरू केली असता त्यांना शेतात ही पिल्ले आढळून आली. त्यांनी तातडीने ही माहिती भंडारा वन विभागाला दिली. तेव्हापासून या पिल्लांच्या संरक्षणासाठी वनमजूर व कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. परंतु, शेतात वन्यजीव असतानासुद्धा उर्वरित शेतात उसाची कापणी सुरूच होती. त्यामुळे मानवी हस्तक्षेप निर्माण झाल्याने त्या बिबट्याने आपल्या पिल्लांची जागा दोन-तिनदा बदलली होती. वन विभागाने ती जागा शोधली व त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते.
बुधवारी दुपारी, भंडाराचे मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांनी शेताला भेट दिली असता उसाच्या चार-पाच दांड्यांच्या मंडपात ती पिल्ले होती. उसाचे पीक कापले होते. सर्वत्र वाळलेला कचरा पडून होता. ज्याठिकाणी ही पिल्ले होती त्याच्या दोन शेत आड उसाची कापणी सुरू होती. तेवढय़ात त्यातील एका शेतकर्‍याने आपल्या शेतातील कचर्‍याला आग लावली. प्रखर उन आणि वारा यामुळे ही आग हळहळू वाढू लागली. आग अधिक वाढू नये म्हणून वनमजूर काळजी घेत होते. परंतु, कुठुनतरी एक ठिणगी उडाल्याने दुसरीकडचे शेत जळू लागले. क्षणात ही आग वणव्यात रुपांतरीत झाली. आता मात्र ही आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. क्षणात ही आग पिल्लांपर्यंत पोहचेल आणि त्यांचा कोळसा होईल, तोच राजकमल जोब, वनक्षेत्रपाल वसीम खान, वनरक्षक डोंगरे व वनमजुरांनी त्या पिल्लांना उचलून सुरक्षित स्थळी हलविले. पाहता पाहता ज्याठिकाणी ही पिले आधी होती तो परिसर पूर्णत: जळून खाक झाला होता. त्यानंतर सदर पिल्लांना मादी बिबट सहज शोधू शकेल अशा परिसरात सुरक्षित ठेवण्यात आले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी काही वनमजुर लावण्यात आले तसेच बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आले.

Exit mobile version