Home महाराष्ट्र माणदेशात नवा आदर्श : पुकळेवाडीत 85 वर्षाच्या वयोवृद्धासह लहान थोर श्रमदानासाठी एकवटले

माणदेशात नवा आदर्श : पुकळेवाडीत 85 वर्षाच्या वयोवृद्धासह लहान थोर श्रमदानासाठी एकवटले

0

माणदेशातील टंचाईग्रस्त गावातील नागरिकांनी पाणीदार गाव बनवण्यासाठी उचलाय विडा

सातारा (आबासो पुकळे)दि.१०ः- नुकतेच माण तालुक्यातील सोळा गावातील आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आल्यामुळे अशी गावे टंचाईग्रस्त म्हणून सातारा जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहेत. विशेष बाब म्हणजे टंचाईग्रस्त गावातील नऊ गावे सत्यमेव जयते वाटर कफ स्पर्धेत सहभागी झाली आहेत. टंचाईग्रस्त गावातील नागरीकांनी पाणीदार गांव बनवण्यासाठी विडा उचल्याचे चित्र माणदेशात पाहयला मिळत आहे. माणदेशाच्या सीमेवर असणा-या पुकळेवाडी गावातील नागरिकांनी आपआपसांतील हेवेदावे बाजुला ठेऊन दमदार पाऊल टाकले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात राहणा-या पुकळेवाडीतील नागरीकांनी जोतिबा मंदिरात एकत्र येऊन गावासाठी तन-मन-धनाने सहभागी होण्याचा निर्धार करून कामाला सुरुवात केली आहे.

गत वर्षी माण तालुक्यात पाऊस पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते. तसेच तालुक्यातील काही भागात चांगला पाऊस झाला होता. परंतु कुकुडवाड व परिसरातील अनेक गावांना मागील वर्ष पावसाने शेवटपर्यंत हुलकावणी दिली होती. या भागात पाऊस पडला नसल्यामुळे जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली होती. तसेच रब्बीच्या हंगामाला पाणी कमी पडल्यामुळे शेतक-यांना चांगलाच फटका बसला होता. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह नगदी पिकांना जोरदार फटका बसला होता.त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील शेतक-यांना शासनाच्या तरतुदीप्रमाणे विविध सवलती मिळतात. मात्र, त्यामध्ये शेतक-यांना नक्की काय फायदे मिळतात याची सुस्पष्ट कल्पना मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहतात. टंचाईग्रस्त गावाच्या यादीत कुकुडवाड, पुकळेवाडी, आगासवाडी, जांभुळणी, वळई, दिवड, दिडवाघवाडी, पानवण, नरवणे, काळेवाडी, दोरगेवाडी, वडजल, गटेवडी, ढाकणी, विरळी, चिलारवाडी आदी गावांचा समावेश आहे. तसेच ही गावे कमी पावसामुळे सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. दरवर्षी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. अन् वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करावा लागतो. म्हणून यावर्षी सत्यमेव जयते वाटरकफ स्पर्धेत टंचाईग्रस्त गावातील पुकळेवाडी, कुकुडवाड, नरवणे, वडजल, विरळी, दिवड, आगासवाडी, चिलारवाडी या गावांनी स्पर्धेत भाग घेऊन दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.आठ एप्रिल ते बावीस मे दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

पाणी टंचाईचे संकट कायम दूर झालंच पाहिजे असा विडा या गावातील सर्व महिला, तरुण, व नागरिकांनी उचलून जोरदारपणे कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढे गावाला टँकर मुक्त करण्याचा निर्धार गावक-यांनी केला आहे. अनेक नागरिक नोकरी व व्यवसायच्या निमित्ताने मुंबई, पुणेसह परराज्यात राहतात; त्यांनी यावेळी गावासाठी वाट्टेल ते करायचेच भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे स्थानिक नागरिक कामाला लागले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुकळेवाडी गावात 80 ते 85 वय पूर्ण केलेले वयोवृद्धांनी पाणी फाॅडेंशनच्या कामात सहभागी होऊन एक आगळावेगळा आदर्श माणदेशात उभा केला आहे. पुकळेवाडी गावक-यांसोबत मुंबई महानगरपालिका नगरसेवक विजय तांडेल, मंत्रालयातील उपसचिव नामदेव भोसले, माण-खटाव प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाॅडेंशन समन्वयक अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवून श्रमदानात सहभाग घेतला. श्रमदान करण्यासाठी  लहानापासून थोरापर्यंत पुकळेवाडीकर एकवटले आहेत. माणदेशातील गावे पाणीदार झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

Exit mobile version