Home राजकीय लोकजागर राजकीय पक्ष लढवणार २८८ जागा-प्रा.वाकुडकर

लोकजागर राजकीय पक्ष लढवणार २८८ जागा-प्रा.वाकुडकर

0

अमरावती,दि.6-  शेतकऱ्यांच्या शंभर युवा मुलांसह विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लोकजागर लढवणार अशी माहिती देत राज्यातील प्रख्यात साहित्यिक, लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी अमरावतीत एका पत्रकार परिषदेत (दि.५) ‘लोकजागर’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.’गाव तेथे उद्योग’ या मॉडेलची पुढील तीन महिन्यांत निर्मिती करणार असल्याचा निर्धार त्यांनी या वेळी बोलून दाखवला.श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला लोकजागरचे महासचिव महादेव मिरगे, अशोक गायगोले, रमेश घोडे, प्रवीण राऊत उपस्थित हाेते.

‘दिल्लीचाही सातबारा हवा मला अन् तुला रे बळीराजाच्या मुला’ तसेच ‘शंभर युवा महाराष्ट्र नवा’ असे ब्रीदवाक्य घेऊन लोकजागर अभियान राबवले जात आहे. राज्याच्या अनेक भागात दहा हजार विद्यार्थी तसेच युवकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनीच सत्ता ताब्यात घ्यावी म्हणून या राजकीय पक्षाची निर्मिती केली जात आहे. लोकजागर सामाजिक संस्था म्हणूनच राहणार असली तरी आगामी दोन महिन्यात लोकजागर हा राजकीय पक्ष म्हणून जाहीर करणार असल्याचे प्रा. वाकुडकर म्हणाले. जानेवारीत यात निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत ‘शंभर युवा महाराष्ट्र नवा’ हे ब्रीद घेऊन लोकजागर पक्ष मैदानात उतरणार आहे. विधानसभेच्या २८८ जागी उमेदवार उभे करून जनतेसमोर नवीन पर्याय देणार आहे. कोल्ह्यांच्या हातून लांडग्यांच्या हाती अन् लांडग्यांच्या हातून पुन्हा कोल्ह्यांच्या हाती सत्ता देणे कोठेतरी थांबले पाहिजे. विद्यार्थी, बुद्धिजीवी, विचारवंत, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षकांमधून लोकजागरच्या माध्यमातून नवीन पर्याय दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात अग्रभागी असलेले शेतकरी नेते, शेतकऱ्यांच्या मुलांनी देशाचे नेतृत्व करावे ही लोकजागरची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. आठ कलमी कार्यक्रमाची घोषणाही प्रा. वाकुडकर यांनी या वेळी केली. हा आठ कलमी कार्यक्रम हाच लोकजागरचा जाहीरनामा राहणार असल्याचे वाकुडकर म्हणाले.

Exit mobile version