Home राजकीय पावसाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी काढणार माेर्चा

पावसाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी काढणार माेर्चा

0

नागपूर,दि..28- उपराजधानीत यंदापासूनच सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधान भवनावर संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरात पार पडलेल्या बैठकीत या मोर्चाच्या आयोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या मोर्चात विदर्भातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असून केंद्र सरकारचा निषेध करून ईव्हीएम व मनुस्मृतीची होळी केली जाणार आहे. या मोर्चासाठी राष्ट्रवादीच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यांत बैठका घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकार संविधान बदलाचे प्रयत्न करीत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. सर्वच समाजघटक देशात असुरक्षित असून देशात अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे.

महिला कधी नव्हे तेवढ्या असुरक्षित असून सत्ताधारी गुन्हेगारांचे समर्थन करीत आहेत. पानसरे, दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्या सनातनी विचाराच्या लोकांनी केल्या आहेत. मात्र, अशा संघटनांवर सरकार कारवाई करीत नाही. त्यामुळेच हा मोर्चा काढला जाणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. देशात निवडणुकांसाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा पुन्हा वापर सुरू करावा, अशी मागणी करताना अलीकडेच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया लाेकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयानंतरही आम्ही ही मागणी करीत आहोत, असे राष्ट्रवादीने नमूद केले आहे. या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते सहभागी होणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

Exit mobile version