Home Top News कोसबी आश्रमशाळेच्या शिक्षकावर विनयभंगाचा आरोप

कोसबी आश्रमशाळेच्या शिक्षकावर विनयभंगाचा आरोप

0

गोंदिया,दि.६- देवरी तालुक्यातील कोसबी येथील बिरसामुंडा आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे. उल्लेखनीय म्हणजे या शिक्षकाने गेल्यावर्षीसुद्धा असा प्रकार केल्याचा आरोप आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवरी तालुक्यातील कोसबी येथे साकोलीच्या सर्वांगीण शिक्षण संस्थेद्वारा बिरसामुंडा आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत ५वी चे १० वी पर्यंत शिक्षणाची सोय असून येथील वसतिगृहात ५४ मुली आणि १८ मुले निवासी असल्याची माहिती आहे. .या शाळेतील एका माध्यमिक शिक्षकाद्वारे इयत्ता ९ वी व १०वी मध्ये शिकणाऱ्या दोन मुलींचा विनयभंग करण्याचा संतापदायक प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. या प्रकाराला या पीडित मुलींनी नेहमी विरोध करत या प्रकाराची माहिती शालेय प्रशासनाला दिल्याचे त्या पीडित विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. हा प्रकार काही महिलांना माहीत झाल्याने त्यांनी आज (दि. ६) हे प्रकरण देवरीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांनी सहायक प्रकल्प अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोरगाव येथे सुरू असलेल्या क्रीडास्थळी पाठविले. या अधिकाऱ्यांनी सदर पिडीतांचे बयाण नोंदविल्यानंतर या आरोपी शिक्षकाविरुद्ध चिचगड पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी पीडित वा त्यांचे पालक आल्याशिवाय आम्ही तक्रार नोंदविणार नाही, असे म्हटल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. असे असले तरी चिचगड पोलिसांनी बोरगाव येथे जाऊन त्या विद्यार्थिनींचे बयाण नोंदविले. उशिरा रात्री पर्यंत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, गेल्या वर्षीसुद्धा याच शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्रालयाकडून चौकशीचे पत्र दि.१६ जून २०१७ रोजी आदिवासी आयुक्तालयाला दिले होते. मात्र, पुढे या कार्यवाहीचे काय झाले, याबाबत विचारले असता प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कानावर हात ठेवले. दरम्यान, सदर शिक्षकाला प्रथमदर्शनी आरोपी मानून प्रकल्प अधिकाऱ्यांनी संस्थेला निलंबित करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version