Home Top News वर्ध्यात NIA चा छापा; दोन महिलांना घेतले ताब्यात

वर्ध्यात NIA चा छापा; दोन महिलांना घेतले ताब्यात

0

वर्धा,दि.20 -शहरातील प्रबुद्धनगरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली व हैद्राबाद येथील अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे.अद्याप तपास यंत्रणेतील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही. पहाटे ४ वाजता छापा टाकून ताब्यात घेण्यात आलेल्या या महिलांना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे बंद खोलीत त्यांना विचारपूस केली जात आहे. एनआयएच्या या चमूमध्ये एका उपपोलीस अधीक्षकासह दोन पोलीस निरीक्षक असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईची माहिती मिळताच वर्धा पोलीस विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वत: सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठले होते. सध्या चौकशी सुरू असून चौकशी पथकातील अधिकारी व स्थानिक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठी गुप्तता बाळगली जात आहे.

आयएसआयएसशी संबंध असल्या प्रकरणी केस आरसी ४/२०१६/एनआयए/डीएलआय या दाखल गुन्ह्याचा तपासाचा एक भाग म्हणून वर्ध्यांत छापा टाकून सदर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी नेमकी ही कारवाई कुठल्या अनुषंगाने आहे याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनाच आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

Exit mobile version