Home Top News छत्तीसगड मध्ये पोलिस-नक्षल चकमकीत दर्रेकसा एरिया कमिटीचा सफाया

छत्तीसगड मध्ये पोलिस-नक्षल चकमकीत दर्रेकसा एरिया कमिटीचा सफाया

0
  • सीतागोटा-शेरपार टेकड्यांवरील थरार

  • छत्तीसगड पोलिसांची यशस्वी कामगिरी

  • चकमकीत 5 महिलांसह 7 नक्षल्यांचा खातमा

  • मृत नक्षल्यांवर होते 32 लाखाचे पारितोषिक
 
वाघनदी (राजनांदगाव छ.ग.) ,दि.3- लगतच्या छत्तीसगड राज्यातील वाघनदी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाèया शेरपार आणि सीतागोटा टेकड्यांवर झालेल्या पोलिस आणि नक्षल चकमकीत पोलिसांनी दर्रेकसा एरिया कमिटीचा सफाया करत पाच महिलांसह एकूण 7 नक्षल्यांना कंठस्नान घातले. उल्लेखनीय म्हणजे या नक्षल्यांवर छत्तीसगड शासनाने 32 लाखांचे पारितोषिक ठेवले होते. या घटनेमुळे नक्षल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये  दर्रेकसा एरिया कमिटीचा सचिव सुखदेव ऊर्फ लक्ष्मण (8लाख बक्षीस), प्रमिला सुखदेव (5 लाख), सीमा (5लाख), मीना (5लाख), ललिता (2 लाख) शिल्पा (2 लाख) आणि रितेश (5 लाख) यांचा समावेश आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी (दि.2) वाघनदी आणि बोरतलाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शेरपार आणि सीतागोटा या दोन गावातील टेकड्यांवर सुमारे 8-10 नक्षल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे दुर्गचे पोलिस महानिरीक्षक हिमांशू गुप्ता यांचे निर्देशात राजनांदगावचे पोलिस उपमहानिरीक्षक रतनलाल डांगी यांचे मार्गदर्शनात राजनांदगावचे पोलिस अधीक्षक बी.एस. ध्रुव यांनी या परिसरात मोहिमेची आखणी केली. महाराष्ट्रातील गोंदिया आणि छत्तीसगड मधील राजनांदगाव जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील नवागाव, दीवानटोला, कोठीटोला, शेरपार, सीतागोटा, मांगीखुटा, भालूकोना या परिसरात हे ऑपरेशन करण्याचे पोलिसांनी ठरविले होते. यासाठी जिल्हा पोलिस, डीआरजी आणि सीएएफ मिळून एकूण चार पोलिस चमू तयार करण्यात आल्या.पहिली तुकडी पोलिस निरीक्षक संग्राम सिंह यांच्या नेतृत्वात 26 जवान तर दुसरी तुकडी उपनिरीक्षक धरम सिंह यांचे नेतृत्वात 20 जवान घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील चाबुकनाला येथून नवागाव-दीवानटोल्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. तिसरी तुकडी उपनिरीक्षक योगेश राठोड यांचे नेतृत्वात 23 जवान तर चवथी तुकडी गातापारचे ठाणेदार लक्ष्मण केवट यांचे नेतृत्वात 26 जवान घेऊन बोरतलाव येथून मांगीखुटा, सीतागोटा, शेरपार च्या दिशेने रवाना करण्यात आली.
 

दरम्यान, गातापारचे ठाणेदार केवट आपल्या चमूसह सर्चिंग करीत असताना सकाळी सुमारे 8च्या सुमारास सीतागोटा आणि शेरपार मध्ये असलेल्या टेकड्यांवर माओवाद्यांचे तीन तंबू आढळून आले. अचानक आलेल्या पोलिस तुकडीला पाहून माओवाद्यांनी पोलिस जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरवात केली. या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला. सुमारे तासभर चाललेल्या गोळीबारात पोलिसांचा वाढता दबाव बघता घनदाट जंगलाचा फायदा उचलून नक्षलवाद्यांनी पलायन केले. गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये 5 महिला आणि 2 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. याशिवाय 1 एके 47, 1 कार्बाईन,1 नग303 रायफल, 2 नग 315 बोर बंदूक, 1 बारा बोर बंदूक आणि 1 सिंगल शॉट सहित काडतूस पोलिसांच्या हाती लागले. यासह 5 किलो क्षमतेचा कुकर आईईडी, 7 पिठ्ठू आणि 1 मोटारोला कंपनीचा वायरलेस सेट, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य मिळाले.

या यशस्वी चकमकीसाठी पोलिस महानिदेशक डी.एम. अवस्थी यांचेसह पोलिस उपमहानिरीक्षक हिमांशू गुप्ता आणि आयटीबीपीचे उपमहानिरीक्षक संजय कोठारी यांनी पोलिस जवानांचे अभिनंदन केले.

Exit mobile version