Home विदर्भ नाबार्डचा पुढाकार मानोरा येथे बचत गट नेतृत्व विकास कार्यशाळा

नाबार्डचा पुढाकार मानोरा येथे बचत गट नेतृत्व विकास कार्यशाळा

0

वाशिम, दि. ३१ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक अर्थात नाबार्ड यांच्या पुढाकारातून मानोरा तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, भारतीय स्टेट बँक मानोरा शाखेचे व्यवस्थापक राजीव रंजन, विस्तार अधिकारी श्री. बेलखेडे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक आशिष राऊत, मनी व्हाईसचे व्यवस्थापक श्री. पडघन यांची उपस्थिती होती.

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांनी प्रास्ताविकातून बँकांची ग्रामीण व कृषि विकासात महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून व्यवहार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तसेच बँकाकडून कर्ज घेताना कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे, याबाबतची माहिती दिली. महिला बचत गटांच्या माध्यमातून आपली स्थिती भक्कम करून विकासाला चालना देतात. बचत गटांच्या महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेवू नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. तसेच या कंपन्या बचत गटांच्या महिलांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. निनावकर यावेळी म्हणाले, बँकांच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. बँक शाखांमध्ये बचत गटांच्या महिलांनी शाखा व्यवस्थापकांना भेटून आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची मागणी करावी. तसेच ही मागणी करताना आपला बचत गट हा आपला आर्थिक लेखा-जोखा व्यवस्थितपणे लिहून ठेवतो की नाही, याबाबत दक्ष असले पाहिजे. अंतर्गत कर्ज व्यवहार करण्यासोबतच बचत गटातील महिलांनी स्वबळावर उभे होण्यासाठी विविध उद्योग सुरु करण्याच्या दृष्टीने बँकांना रीतसर प्रस्ताव सादर करावेत. यावेळी त्यांनी अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना यासह बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. महिलांना डिजिटल व्यवहाराची कास धरून बचत गटांचे लेखे अद्ययावत ठेवण्याचे तसेच सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

श्री. खडसे यावेळी म्हणाले, बचत गटातील महिला या आज बँकांच्या अर्थसहाय्यामुळे विविध उद्योग, व्यवसाय सुरु करून सक्षम होत आहेत. महिलांनी आपला विकास साधण्यासाठी विविध प्रकारची प्रशिक्षण घ्यावे, ज्या मधून त्यांचे नेतृत्व विकसित होण्यास मदत होईल. महिलांनी आता अंतर्गत कर्ज व्यवहार करण्यापुरतेच मर्यादित न राहता, बँकेत आपली पत सुधारावी. बँकेच्या अर्थसहाय्यातून वेगवेगळे व्यवसाय सुरु करावेत. त्यामुळे कुटुंबाला सुद्धा बचतगटातील महिलेचा आधार होईल, महिलांनी अंधश्रद्धेपासून व व्यसनापासून दूर राहावे. मुलांच्या शिक्षण, आरोग्याकडे  लक्ष द्यावे. प्रत्येक महिलेने शौचालयाचा नियमित वापर करावा व कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुद्धा वापर करण्यास बाध्य करावे, असे सांगितले.

श्री. राऊत यांनी भारतीय स्टेट बँक संचालित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत ग्रामीण भागातील बेरोजगार १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना स्वावलंबी करण्यासाठी जवळपास ६० ते ७० प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येतात. यामधून त्यांना स्वबळावर उभे राहण्यासाठी मदत केली जात असल्याचे सांगितले. तसेच आरसेटीची कार्यपद्धती, उद्देश आणि उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांची तसेच सुविधांची माहिती दिली.

यावेळी उपस्थित महिलांना रुपी कार्डचा व एटीएम मशीनचा वापर कशा प्रकारे पैसे काढण्यासाठी करावा, तसेच सामाजिक सुरक्षा योजनांवर आधारित विविध चित्रफित दाखविण्यात आल्या. यावेळी उपस्थित बचत गटांच्या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देवून त्यांना येणाऱ्या समस्यांची सोडवून कशाप्रकारे करता येईल, याबाबत श्री. खंडरे व श्री. निनावकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी श्री. बेलखेडे यांनी केले, तर आभार आरसेटीचे आशिष राऊत यांनी मानले. यावेळी मानोरा तालुक्यातील विविध गावांतील बचत गटांच्या अध्यक्ष, सचिव व सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version