Home विदर्भ महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंरोजगाराकडे वळावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंरोजगाराकडे वळावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0

सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
गोंदिया दि.४.: महिलांनी आत्मनिर्भर होण्याकरीता स्वयंरोजगाराकडे वळावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंतीनिमीत्त स्वयंसहाय्य बचतगटातून स्वावलंबनाकडे वळणाऱ्या महिलांचा ‘महिला संवाद पर्वङ्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, नगरसेविका भावना कदम, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे व नाबार्डचे निरज जागरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सविता बेदरकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या जीवन कार्यावर महिलांना विस्तृत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रत्येक महिलांनी सावित्रीबाईंचे आदर्श पुढे ठेवून कार्य करावे. भावना कदम म्हणाल्या, महिलांनी समाजकार्याकडे अधिक लक्ष्य केंद्रीत करावे. मुली घडवतांना मुलांना सुध्दा समान संस्कार दिले पाहिजेत. तसेच महिला सक्षमीकरण करतांना त्याची सुरुवात आपल्या कुटूंबातून केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. निरज जागरे यांनी सुध्दा महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी अनिता बडगे, वैशाली डोये, श्रीमती पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने इंटरनेट साथींना उपजिविका विकासासाठी ३६ प्रिंटरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन प्रदिप कुकडकर यांनी केले, उपस्थितांचे आभार सतीश मार्कंड यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला सावित्रीबाईच्या वेशभूषेत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया बेलेकर, रामेश्वर सोनवाने, प्रणाली कोटांगले, एकांत वरघने, मोनिता चौधरी, कुंजलता भुरकूंडे, उत्कर्ष सीएमआरसी स्टाफ व सहयोगिनी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version