38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024
Home Blog Page 3

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट;पारा 40 अंशांवर जाणार,हवामान खात्याचा अलर्ट

0

पुणे:- राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत. राज्यात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जानेसह अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.आता देशातील काही भागासाह राज्यातही उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात आता तापमानात मोठी वाढ होत असून आणखी आठवडाभर वातावरण आणखी तापण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात पुढील 24 तासांसाठी विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात तापमानात प्रंचड वाढ झाली आहे. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. तर वाढत्या उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पुढाल 24 तासांसाठी ठाणे, मुंबई, रायगडसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील 24 तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोकण, ठाणे, मुंबई येथे तापमानाचा पार 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर जाणार आहे. मुंहई, कोकण, ठाणे आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बीडमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल

0

बीड दि. १८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत या अंतर्गत 92 प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता अमलात आली आणि त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे या प्रकारच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आचारसंहिता कालावधी सुरु झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तथा विक्री विरुद्ध जोरदार कारवाया सुरु केल्या असून आतापर्यंत एकूण 92 गुन्हे नोंद करण्यात आलेले असून त्यात 77 आरोपींना अटक तसेच  ₹ 12.91 /- लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत केलेल्या कारवाईत प्रामुख्याने हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई यांचा समावेश आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आचारसंहिता अनुषंगाने प्रमुख राज्य व राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांवर संशयित वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. हॉटेल व धाबाचालकांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्या असून अवैध मद्यविक्री अथवा सेवन करतांना कोणी आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती यांच्या दैनंदिन मद्यविक्रीवर देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. विहित नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

प्औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया आजपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0

छत्रपती संभाजीनगरदि.१८: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया दि.१८ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान ही सर्व प्रक्रिया नामनिर्देशनाने सुरु होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली असून सर्व पूर्वतयारीचा अंतिम आढावा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज घेतला.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सह उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरातील सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने बदल करावयाचे वाहतुक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याबाबतचे मार्ग, वाहनांचे पार्किंग, उमेदवारी अर्ज दाखल करावयास येणाऱ्या उमेदवारांसाठी असणारे नियम इ. बाबत सुरक्षा यंत्रणांकडून आढावा घेण्यात आला. येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक इ. तयारीचा आढावा घेण्यात आला. नामनिर्देशन दाखल करणे, त्यांची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त व आयोगाच्या सुरक्षा निर्देशांची तपासणी करण्यात आली.

वाहतुक मार्गात बदल

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि.१८ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने दि.१८ (उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून) ते दि.२९ पर्यंत (उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिनांकापर्यंत) वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय परिसरातील वाहतुक वळविण्यात आली आहे. दि.१८ ते दि.२९  दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायं.६ दरम्यान या परिसरातील वाहतुक सर्व वाहनांसाठी बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

बंद वाहतुक मार्ग

चांदणे चौक- जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानाजवळील टी- पॉईंट पर्यंत.

पर्यायी मार्ग– 

  • चांदणे चौक- अण्णाभाऊ साठे च्चौक- उद्धवराव पाटील चौक- सत्यविष्णू हॉस्पिटल चौक- एन १२ गणपती विसर्जन विहीर मार्गे येतील व जातील.
  • चांदणे चौक- फाजलपुरा- चेलीपुरा चौक- चंपा चौक- विभागीय आयुक्त निवासस्थानासमोरील दर्गा मार्गे येतील व जातील.

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावशयक सेवेच्या वाहनांना हा वाहतुक बदल लागू असणार नाही असे शहर वाहतुक शाखा -१ चे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी कळविले आहे.

नागपूर जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्रे,आज रवाना होणार मतदान पथके

0
  • कडेकोट पोलिस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष
  • बाहेरगावातील मतदारांनाही आवाहन

नागपूर, दि. १८ :  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके 18 एप्रिल रोजी सकाळपासून रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, तहसिलदार (निवडणूक) वैशाली पाटील यावेळी उपस्थित होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर न्यावयाची आहे. यासाठी सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. विशेषतः नागपूर बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूरात यावे.   मतदान शपथ, मॅरेथॅान, बुथ अवेरनेस ग्रुप, सोसायटी कनेक्ट अशा मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी जरूर सहभागी व्हावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. इटनकर यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्रे

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. यात काटोल 15, सावनेर 11, हिंगणा 7, उमरेड 13, कामठी 7 तर रामटेकमध्ये 10 संवेदशील मतदान केंद्रे आहेत. तर नागपूर लोकसभेंतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 11, नागपूर दक्षिण 11, नागपूर पूर्व 10, नागपूर मध्य 8, नागपूर पश्चिम 9, नागपूर उत्तर 12 अशा एकूण 61 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे.

रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे

जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे आहेत. यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली. या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके उद्या, दि. 18 एप्रिल रोजी मतदानस्थळी रवाना होणार आहेत. मतदान पथकांसोबत प्राथमिक वैद्यकीय किट, ग्लुकोज असणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे.

12 महिला मतदान केंद्रे

दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान  केंद्रे  असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत.

सी व्हिजिल ॲपवर 64 तक्रारी

सी व्हिजिल या ॲपवर 64 तक्रारींची नोंद करण्यात आली.  यात 20 तक्रारींमध्ये तथ्य  आढळून आले नाही. तर 44 तक्रारींचे निरसन करण्यात आले.

देवलापार येथे आदिवासी मतदार केंद्र

देवलापार येथे आदिवासी मतदान केंद्र असणार आहे.  मतदान सुरू होताच सुरुवातीच्या मतदारांचे पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांग, युवा अशी विशेष मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच काही मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर मतदान केंद्रांवर टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यात खर्च निरीक्षक डॉ. जांगिड यांच्याकडून रात्री उशिरा नाक्यांची तपासणी

0

नांदेड दि.18: नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी रात्री उशिरा आकस्मिक भेटी देऊन अनेक नाक्‍यांची तपासणी केली. त्यांच्या या भेटीमुळे यंत्रणा सतर्क झाली असून मोठ्या प्रमाणात नाकेबंदी केली जात आहे.

लोकसभा आचारसंहिता लागल्यानंतर सर्वात प्रथम आलेले खर्च निरीक्षक डॉ.जांगिड यांनी आपल्या अचानक दौऱ्यातून नांदेड शहर, भोकर, मालेगाव, कासारखेडा आदी ठिकाणच्या विविध स्थानिक निगराणी दलांच्या कामकाजाचा आढावा घेतला. याशिवाय भरारी पथक नेमके काय काम करत आहेत, याबाबतही त्यांनी चौकशी केली.

नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नगदी रोकड, सोने, चांदी, मद्य व मादक पदार्थ व अन्य काही भेटवस्तू जप्त करण्यात आले आहे. डॉ.जांगिड यांच्याकडून वेळोवेळी अशा प्रकारे अचानक पाहणी केली जात असल्यामुळे निवडणूक काळातील तपासणी पथके जागृत झाली आहेत.

जिल्ह्यात सध्या 25 निगराणी केंद्र आहेत. ज्या ठिकाणी 24 तास वेगवेगळ्या वाहनांची तपासणी केली जाते. या काळात नगदी रक्कम, मादक पदार्थ, मद्य याची तस्करी प्रतिबंधित केली जाते. अशाच प्रकारच्या 60 फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. फिरत्या पथकाकडून देखील अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकारावर नियंत्रण ठेवले जात आहे.

पार्टी जीवावर बेतली; दोन तरूण तलावात बुडाले

0

अमरावती : ‘रोडगा पार्टी’च्‍या निमित्‍ताने मालखेड येथील तलावानजीक सहभोजनासाठी गेलेल्‍या दोन तरूणांचा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथील ही घटना आहे.

प्रणव सुरेश पायकाडे (१८) व निखिल अनंतराव खर्चान (२४, दोघेही रा. आष्टी) अशी मृतांची नावे आहेत. सावंगा विठोबा येथे श्री अवधुतबुवा संस्थान परिसरात गुढी पाडव्यानिमित्त मोठी यात्रा भरते. या ठिकाणी रोडग्याचे जेवण देण्याची परंपरा आहे. रोडगा हा विदर्भातील खास पारंपारिक खाद्यपदार्थ आहे. भातकुली तालुक्यातील आष्टी येथील पायकाडे कुटुंबाने बुधवारी रोडग्याचे जेवण ठरविले होते. त्यांच्यासमवेत निखिलदेखील आला होता. रोडग्याच्‍या जेवणाची तयारी सुरू असताना प्रणव व निखिल हे पोहण्यासाठी मालखेड तलावात उतरले. मात्र, त्यांचा गाळात फसून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पायकाडे कुटुंबाने नागरिकांसमवेत मालखेड तलावाकडे धाव घेतली. चांदूर रेल्वे येथील पोलीस निरीक्षकांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह त्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले.

कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठ करणार पोलिसात तक्रार

0

मुंबई : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका १० ते १२ हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात काही दिवसापूर्वी फेसबुक या समाज माध्यमावर आल्यावर पुणे येथील एका व्यक्तींनी ती जाहिरात पाहून, त्याने काही रक्कम दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲप वर एक बनावट गुणपत्रिका मिळाली, अशाप्रकारची माहिती विद्यापीठास प्राप्त झाली आहे. याची विद्यापीठांनी गंभीर दखल घेतली आहे.यावर लवकरच मुंबई विद्यापीठ पोलीस स्थानकांमध्ये याची सायबर तक्रार नोंदविणार आहे. विद्यार्थ्यांनी अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

पुणे येथील एका व्यक्तींने फेसबुक या समाज माध्यमावर मुंबई विद्यापीठाची पदवी घरी बसून एका दिवसात १० ते १२ हजारात मिळेल अशी जाहिरात पाहिली त्याने त्या जाहिरातीतील फोनवर एका व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने २००० रुपये ऍडव्हान्स मागितले, ऍडव्हान्स रक्कम भरल्यानंतर त्याच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका प्राप्त झाली अशी माहिती मुंबई विद्यापीठास प्राप्त झाली. याची गंभीर दखल मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी घेतली व पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत यानुसार पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

अशाप्रकारच्या कोणत्याही फसव्या जाहिरातीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. ही पदवी किंवा गुणपत्रिका बनावट आहे. फोटोशॉप किंवा इतर साधनाचा वापर करून बनावट गुणपत्रिका किंवा पदवी बनविली आहे. या सोबत ज्या व्यक्तींनी गुणपत्रिका घेतली आहे. तीच बनावट आहे. एप्रिल २०२३ ची बीएससी सत्र ६ ची कथित गुणपत्रिका असून त्यावर स्वाक्षरी मात्र यापूर्वीच्या जुन्या परीक्षा संचालकांची आहे. यामुळेच अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे तसेच पदवी देणाऱ्यांवर व पदवी घेणाऱ्यांवर मुंबई विद्यापीठ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

‘शाळापूर्व तयारी अभियान’ जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

0

स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता १ ली दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी होणार

वाशिम,दि.१७ – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत मागील वर्षी एप्रिल २३ ते जून २३ या कालावधीत इयत्ता १ ली दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान” अंतर्गत “पहिले पाऊल” हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार स्टार्स (STARS) प्रकल्पांतर्गत सन २०२४ -२५ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता १ ली दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्याकरिता १० एप्रिल रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे शाळापूर्व तयारी अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत प्रथम सत्रात अधिव्याख्याता विलास कडाळे यांनी शाळापूर्व तयारी अभियान संकल्पना व स्वरूप, शाळापूर्व तयारी अभियान मेळावा कोणत्या बालकासाठी व का घ्यावा, कोणत्या कालावधीमध्ये घ्यावा, मेळावा घेण्याकरिता जनजागृती कशाप्रकारे करावी, याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही व अंमलबजावणी तसेच शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्यासाठी मेळावा पूर्वतयारी, प्रत्यक्ष मेळावा क्र. १ चे आयोजन करणे, मेळावा क्र. २ पर्यत दरम्यानच्या कालावधीत इयत्ता १ ली दाखलपात्र असलेल्या मुलांचे पालक/माता यांनी शाळेतील पहिले पाऊल या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार मुलांकडून तयारी करून घेणे हे तीन महत्वाचे टप्पे आहेत याबाबत माहिती दिली.व
 शाळापूर्व तयारी अभियान कार्यशाळेचे आयोजन तालुकास्तरावर, केंद्रस्तरावर करण्यासंबंधी सांगितले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिमचे प्राचार्य भा. भ. पुटवाड यांनी शाळापूर्व तयारी अभियान अंमलबजावणी मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व, प्रशासन अधिकारी, न. प., शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका या सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेची काय भूमिका आहे, व ती भूमिका त्यांनी कशाप्रकारे पार पाडावी याबाबत मार्गदर्शन केले.
 शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी “शाळापूर्व तयारी अभियान” मेळावा पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी, मेळावे दर्जेदार व उल्लेखनीय करण्याकरिता प्रयत्नशील असणे महत्वाचे आहे. गाव स्तरावर अंगणवाडी सेविका, शिक्षण विभागातर्गत यंत्रणा यांचा समन्वय असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष पालक/माता गटांना भेटी देऊन त्यांचे समुपदेशन करावे. “शाळापूर्व तयारी अभियान” करिता केलेले काम हे विविध लिंकच्या माध्यमातून तथा सांख्यिकीय स्वरुपात दिसायला हवे याकरिता वेबपोर्टलचा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती स्वाती ढोबळे विषय साधन व्यक्ती यांनी मेळावा क्र. १ चे प्रत्यक्ष आयोजन करून त्याकरिता ७ स्टाल्स लावले त्यामध्ये नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन यानुसार सर्व स्टाल्सवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात कशाप्रकारे कराव्या याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
सदर कार्यशाळेकरिता समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी मंगेश गवई व प्रथम संस्था प्रतिनिधी शुभम देशमुख उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अधिव्याख्याता शिवशंकर मोरे ,जिल्हा समन्वयक स्मिता इंगळे,संजीवनी दारोकार, विशेष शिक्षक रुपाली सहारे आदींचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेमध्ये तालुकास्तरीय केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
  • निवडणूक प्रचाराची वेळ आजपासून समाप्त

         गोंदिया, दि.17 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी निवडणूक प्रक्रियेची माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

        जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी    6 वाजता पासून उमेदवारांच्या प्रचाराची वेळ समाप्त होत असून आदर्श आचारसंहिता अंतर्गत लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 126 अंतर्गत जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली असून मतदानाच्या दिवसापासून 48 तास पूर्व कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक प्रचार करणार येणार नाही. जिल्ह्यात एकूण 10 लाख 92 हजार 546 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 41 हजार 272 पुरुष मतदार आहेत तर 5 लाख 51 हजार 264 स्त्री मतदार असून इतर 10 मतदार आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 401 मतदारांनी गृह मतदान केले असून निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेले 4 हजार 467 मतदारांनी पोस्टल बॅलेट मतदान केले आहे. जिल्ह्यात एकूण 1288 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार व 85 वर्ष अधिक वयोगटातील मतदारांकरीता मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून 723 व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 644 मतदान केंद्रावर वेब-कास्टींग संच लावण्यात आले असून विधानसभा मतदारसंघ स्तरावर व जिल्हास्तरावर कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उष्णतेची तीव्रता लक्षात घेता उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत मेडिकल कीटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान केंद्रावर 5 हजार 716 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडणुकीत नियुक्त मतदान पथकांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व परत आणण्याकरीता 181 बसेस व 241 जिपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 63-अर्जुनी मोरगाव व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3 वाजतापर्यंत राहणार असून 64-तिरोडा व 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत राहणार आहे असे त्यांनी सांगितले.

          निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दिनांक 17, 18 व 19 एप्रिल रोजी ड्राय डे म्हणून पाळण्यात यावा. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्रावर मोबाईल सोबत बाळगता येणार आहे. रात्री 10 वाजेनंतर स्पीकर वाजविण्यावर बंदी असणार आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. सुजान नागरिकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.

मतदान करणाऱ्यांना मिळणार आझाद बगीच्यात मोफत प्रवेश

0

मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास मनपाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा

चंद्रपूर १७ एप्रिल – चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.या मतदानात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असुन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 19 एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील,ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना 19 व 20 एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार आहे
13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न प्रशासनामार्फत केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.या मतदार चिठ्ठीद्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.
या वाटपादरम्यान जर काही नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल तर त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करता येईल किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये,नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर ( Epic Number ) टाकून माहिती करून घेता येईल. त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर जावून माहिती करून घेता येईल किंवा चंद्रपूर
महानगरपालिकेच्या 18001237980 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून मतदार चिठ्ठीबाबत माहिती घेता येईल.
तेव्हा सर्व नागरिकांनी १९ एप्रिल रोजी मतदान करून जागरूक नागरिकाचा हक्क बजावण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.