39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी विजय,इतर ठिकाणी मतमोजणी सुरू

धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी विजय,इतर ठिकाणी मतमोजणी सुरू

0
291

blank

गोंदिया,दि.03ः राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते.आज या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी विजय मिळवला आहे. हा महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल 234 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेलांनी विजय मिळवला. त्यांना 332 मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या 98 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यानंतर ही पहिली मोठी निवडणूक होती. महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून उमेदवार दिला होता. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसेल. तसेच काय निकाल लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर धुळ्यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

पुणे : मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतमोजणी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

याठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत. कोविड-19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्‍क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, फेसशिल्‍ड आदी साहित्याचा समावेश असलेले किट देण्‍यात आले आहे.

अमरावती मतमोजणीस सुरुवात

विलासनगर येथील शासकीय गोदाम येथे असलेल्या मजमोजणी स्थळी आज सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलवण्यात आल्या. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत.

प्रत्येक मतदारसंघात किती झाले होते मतदान?

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

blank