
भंडारा,दि.08ः-कोका अभयारण्यातील अवैध वृक्ष कटाई व अवैध मुरुम उत्खननाबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देत वनपरिक्षेत्र अधिकार्यांना १0 लाख रुपयांची खंडणी मागणार्या दोघांविरुद्ध कारधा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन रंगारी, राहूल मनोहर गणवीर रा. शिवाजी वॉर्ड, साकोली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या कोका अभयारण्यात सचिन शंकर जाधव हे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ७ ऑक्टोबरपासून सचिन रंगारी आणि राहूल गणवीर यांनी एका वन्यजीव संरक्षण संस्थेच्या नावावर वनपरिक्षेत्रातील अवैध कटाई व अवैध मुरुम उत्खननाची तक्र ार वरिष्ठांकडे करतो तसेच कारवाई करण्याची धमकी देत वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांना मोबाईलवर १0 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यासाठी दोघेही वारंवार जाधव यांना मानसिक व शारिरीक त्रास देत होते. अखेरीस सचिन जाधव यांनी याबाबतची तक्रार कारधा पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी सचिन रंगारी आणि राहूल गणवीर या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३८५, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक परशुरामकर करीत आहेत.





