39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ तिरोडा एसडीओ कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण

तिरोडा एसडीओ कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण

0
71

blank

तिरोडा : येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला सुरुवातीपासूनच रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मंजूर पदसंख्येपैकी रिक्त पदेच अधिक असल्याने कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच ऑगस्ट 2020 पासून नियमित उपविभागीय अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. या प्रकाराकडे लक्ष घालून शासन-प्रशासनाने येथील रिक्त पदे भरणे अत्यावश्यक झाले आहे.

काही वर्षांपूर्वी तिरोडा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय मंजूर होऊन सुरूही झाले. त्यासाठी एकूण 10 पदे मंजूर करण्यात आली. यात उपविभागीय अधिकारी मंजूर पद 1 असून सध्या हे पद रिक्त आहे. अव्वल कारकुनाची 2 पदे मंजूर असून 1 पद भरण्यात आले आहे तर 1 पद रिक्त आहे. महसूल सहायकाचे 2 पद मंजूर असून 1 पद भरण्यात आले तर 1 पद रिक्त आहे. वाहन चालकाचे 1 पद मंजूर असून ते आताही भरण्यात आले नाही. स्टेनोचे 1 पद मंजूर असून ते रिक्तच आहे. शिपायाचे 2 पद मंजूर असून 1 भरण्यात आले तर 1 पद रिक्त आहे. तसेच नायब तहसीलदाराचे 1 पद मंजूर असून ते भरण्यात आले आहे. अशाप्रकारे मंजूर 10 पदांपैकी 6 पदे रिक्त असून केवळ 4 कर्मचार्‍यांच्या भरवश्यावर हे उपविभागाचे कार्यालय सुरू आहे.

अनेक कामे रखडलेली

येथे 12 ऑगस्ट 2020 पासून नियमित उपविभागीय अधिकारी नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून मंजूर होण्यासाठी आलेल्या मर्ग समरी, नागरिकांच्या झुडपी जंगलाच्या जमिनीची समस्या व इतर अनेक कामे रखडलेली आहेत. नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. पण कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण व प्रभारी अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. अनेक महिन्यापासून नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

5 प्रभारी अधिकारी बदलले

तिरोड्यात 12 ऑगस्ट 2020 पर्यंत गंगाधर तळपाडे हे उपविभागीय अधिकारी होते. त्यानंतर येथे नियमित अधिकारी मिळू शकले नाही. तेव्हापासून आतापर्यंत पाच ते सहा महिन्यांचा काळ लोटत असून या काळात तब्बल 5 प्रभारी अधिकारी बदलले आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे यांच्यानंतर 12 ऑगस्ट 2020 पासून गोंदियाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राहुल खांदेसराड यांना तिरोड्याच्या उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला. त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर 2020 पासून तिरोड्याचे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना प्रभार देण्यात आला. यानंतर 14 डिसेंबर 2020 पासून गोंदियाचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजय राऊत यांना प्रभार सोपविण्यात आला. तर 5 जानेवारी 2021 पासून गोरेगावचे तहसीलदार सचिन गोसावी यांना प्रभार देण्यात आला. तसेच 1 फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजय राऊत यांना प्रभार देण्यात आला आहे. यापैकी अनेक प्रभारी अधिकारी तिरोडा कार्यालयात आले नसल्याचेच समजते. त्यामुळे नागरिकांची कामे रखडलेली आहेत.

8 फेब्रुवारीला नियमित अधिकारी रुजू होणार

आता तिरोडा उपविभागासाठी नवीन व नियमित उपविभागीय अधिकारी सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 रोजी रुजू होणार आहेत. गडचिरोली येथील अरुणकुमार नासते हे या पदावर रुजू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या प्रलंबित समस्या त्यानंतरच मार्गी लागतील, असे दिसून येत आहे.

तहसील कार्यालयातही पदे रिक्त

तिरोड्याच्या तहसील कार्यालयातही पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. सध्या येथे 4 नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

blank