35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांना भावपूर्ण निरोप

सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांना भावपूर्ण निरोप

0
123

blank

वाशिम, दि. १९ : सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांचा जिल्ह्यातील प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. आज, १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार शीतल वाणी-सोलट यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय प्रशासन सेवेत (आय.ए.एस.) निवड झाल्यानंतर श्री. वाघमारे हे परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून १४ मे २०२० रोजी जिल्ह्यात रुजू झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, विद्यमान जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्यासोबत त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजाविली.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, श्री. वाघमारे यांनी जिल्ह्यात परिविक्षाधीन कालावधीत विविध जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने सांभाळल्या. मंगरूळपीर तहसीलदार म्हणून काम पाहताना त्यांनी कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. तसेच उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यासारख्या पदांवर त्यांनी चांगले काम केले. कोरोना काळात त्यांची खूप मदत झाली, असे त्यांनी सांगितले.

सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. वाघमारे म्हणाले, गेली दहा महिने वाशिम जिल्ह्यात काम करतांना विभागीय आयुक्त पीयूष सिंह, तत्कालीन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व विद्यमान जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्याकडून खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या, याचे मला समाधान आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी या काळात चांगले सहकार्य केले. जिल्ह्यात काम करताना आलेल्या अनुभवाचा भविष्यातील शासकीय कामकाजात नक्की फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वाशिम जिल्ह्यात असतांना कधीही परकेपणाची वागणूक मिळाली नाही, सर्वांनी आपुलकीची वागणूक दिली, ही बाब मला कायम स्मरणात राहील, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. हवालदार, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक धर्मराज चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.

blank