
ब्रम्हपुरी-तालुक्यातील रणमोचन येथील शेतकर्यांची बोळेगाव येथील शेतशिवारात स्वतःच्या मालकीची शेती आहे. या मार्गावर पूल नसल्याने त्यांना शेती करायला जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन चक्क डोंग्यातून प्रवास करावा लागत आहे.
रणमोचन गावातील जवळपास अंदाजे 60 ते 70 शेतकर्यांची शेती बोळेगाव शेतशिवारात आहे. येथे अंदाजे दीडशे एकरच्या जवळपास शेतजमीन आहे. मात्र, स्वतःची शेती करण्यासाठी त्यांना पावसाळ्याच्या दिवसात रणमोचन व बोळेगाव यांच्या मधोमध असलेल्या भूतीनाल्यांच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या नाल्यातील 200 फूट जागेसाठी त्यांना 15 किलोमीटर अंतर पारडगाववरून कापत जावे लागते. नाल्यात खाजगी मालकीची हक्क असलेला डोंगा वासुदेव मेश्राम व ऋषी मेश्राम हे चालवित असून, त्यांना दान स्वरूपात शेतीतील दोन टक्के मिळकतीचा हिस्सा द्यावा लागतो. परंतु, आज या दान स्वरूपाची किंमत अधिकाधिक वाढत गेल्याने व डोंग्याची परिस्थिती बिकट असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी पूल अथवा नवीन नाव द्यावी, अशी मागणी रणमोचन येथील शेतकर्यांनी केली आहे.





