
– वाहनचालक जखमी, क्रांद्री मार्गावरील अपघात
भंडारा-जनावरांची तस्करी करणा-या पिकअप वाहनाने ट्रकला जबर धडक देण्याची घटना मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सदर घटनेत पिकअप चालक गंभीर जखमी झाला असून वाहनातील सहा जनावरे थोडक्यात बचावली. फिरोज खान शेख गफ्फार खान (25) असे जखमी चालकाचे नाव आहे.
आंधळगाव ठाण्याच्या हद्दीत जंगलव्याप्त गावातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी केली जाते. मात्र याकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जनावर तस्करांची भरधाव वाहने गावातून सुसाट पळविली जात आहे. सोमवारी रात्री असेच पिकअप वाहन क्रमांक एमएच 40/ बी.एल. 9095 सहा जनावरांना निर्दयपणे कोंबून तुमसरकडून कामठीकडे भरधाव वेगाने निघाले होते. दरम्यान मोहाडी तालुक्यातील क्रांद्री गावाजवळ समोरून आलेल्या ट्रक क्रमांक एमएम 34/बीजी 9409 ला जबर धकड दिली.
यात पिकअप वाहनाचा चुराडा होऊन चालक गंभीर जखमी झाला. तर ट्रकचे डिझेल टँक फूटले. सुदैवाने पिकअप मधील सहा जनावरे थोडक्यात बचावली. घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना होताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी फिर्यादी ट्रकचालक महेंद्रसिंग रघुवंशी रा. जोबा(मध्यप्रदेश) यांच्या तक्रारीवरून आरोपी फिरोज खान शेख रा. कामठी याच्याविरूध्द भांदविचे कलम 279, 337 तसेच प्राणी संरक्षण अधिनियमान्वय आंधळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





