39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ 11 ते 17 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह

11 ते 17 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह

0
60

blank

 गोंदिया,दि.10 : जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर पर्यंत सिकलसेल आजार
नियंत्रण सप्ताह साजरा करण्यात येत असून सदर सप्ताहात सर्व प्राथमिक
आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच
गावपातळीवर मोफत सिकलसेल तपासणीची शिबीर आयोजित करण्यात येत असल्याची
माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी दिली आहे.

1 ते 30 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींची मोफत सिकलसेल तपासणी
करुन त्यांना सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यात
येईल. सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे.
सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 1 हजार
रुपये लाभ मिळतो. तसेच औषधे व रक्त पुरवठा, समुपदेशन, इयत्ता 10 वी व 12
वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्येक तासाला 20
मिनीट अधिक अवधी दिला जातो. सिकलसेल रुग्णांना उपचाराकरीता बस प्रवासात
सवलत दिली जाते. सिकलसेल हा अनुवांशिक आजार आहे. सिकलसेल आजाराचा संपूर्ण
उपचार नाही, पण नियंत्रण शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमीत आणि समतोल
आहार आवश्यक असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी. तरी जिल्ह्यातील
नवयुवकांनी आवर्जुन पुढे येऊन सिकलसेल बाबत सोल्यूबिलिटी तपासणी करण्याचे
आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी केले आहे.

blank