42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय ओबीसींशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा- आ. मिटकरी

ओबीसींशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा- आ. मिटकरी

0
182

blank

देवरी,दि.18-ओबीसींना आश्वासन देऊन केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली. राज्यात पाच वर्षे फडणवीस तर केंद्रात मोदीच्या नेतृत्वात सरकार आहे. ओबीसींना आरक्षण मिळू नये, म्हणून केंद्र राज्याला इंपेरिकल डाटा देत नाही. फडणवीस तो केंद्राने देऊ नये, असे म्हणतात. मग फडणवीसांनी सत्तेत असताना तो का मागितला होता. आता ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप युद्धस्तरावर काम करीत आहे आणि त्याचे बील महाविकास आघाडीच्या नावाने फाडण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहे. म्हणून ओबीसींनी जागे होऊन आपल्याशी गद्दारी करणाऱ्यांना आगामी निवडणूकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसनेते आमदार अमोल मिटकरी यांनी देवरी येथे केले.

ते स्थानिक पंचशील चौकात आयोजित निवडणुक प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव शेख उस्मान अली, नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, माजी जि.प.सदस्य रमेश ताराम, गोपाल तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एक महत्त्चाचा सत्ताधारी पक्ष असल्याने देवरी नगरवासीयांना तथा गोंदिया जिल्ह्याला विकास निधी कधीही कमी पडू देणार नाही. यासाठी नगरपंचायतीसह जिप व पंसमध्ये राष्ट्रवादीचे प्रतिनिधी निवडून पाठविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. भाजपच्या पोकळ आश्वासनांना बळी पडू नका. ते ओबीसीमध्ये फुट पाडण्यासाठी आंदोलनाची आणि निवडणुकीवर बहिस्काराची भाषा बोलत आहेत. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची खरी किम्मत होते तर गद्दारांना धडा पण शिकविला जातो. याउलट भाजप मध्ये खोटे बोलणाऱ्याना थेट पंतप्रधान केले जाते, अशी कोटी करण्यासही ते विसरले नाही. यावेळी उस्मान अल्ली यांनी सुध्दा सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम समुदायाला भाजपपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आ. मिटकरी यांना ऐकण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, देवरीत त्यांचे आगमन उशिरा झाल्याने आणि थंडीचा प्रकोप वाढल्याने त्यांच्या चाहत्यांची काही प्रमाणात निराशा झाली.

blank