
गोंदिया,दि.29ः-, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्या पतीवर बंदुकीतून गोळ्या झाडणार्या दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना आज २९ जानेवारी रोजी न्यायालयात सादर केले. उदय गोपलानी (४२), गणेश जाधव (३५) दोन्ही रा. सिव्हील लाईन, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनाथ लोकांसाठी प्रा. सविता बेदरकर काम करतात. त्यांचे पति धनेंद्र भुरले (५५) त्यांना समाजकार्यात सहकार्य करतात. त्यांची शेती शहराजवळील टेमनी येथे आहे. शेतात अनाथ बालकांसाठी आश्रमाचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम पाहण्यासाठी भुरले हे शुक्रवार 28 जानेवारी रोजी शेतावर गेले होते.ते सायंकाळी ६.३० वाजता भुरले शेतातून गोंदियाकडे परत येत असताना दोन दुचाकीस्वारांनी त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर देशी कट्टातून गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान भुरले यांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठत घटनेची तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी प्रथम त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांच्या पत्नी सविता बेदरकर यांनी सांगितले. गोळीबाराचा प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याचे सांगितले जाते.ते भुरले यांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी उदय गोपलानी व गणेश जाधव या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना आज 29 जानेवारी रोजी न्यायालयात सादर करण्यात आले.





