
वर्धा,दि.09ः– हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला हिंगणघाट न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी उद्या पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार असून विकेश नगराळेला शिक्षा जाहीर होण्याची शक्यता आहे. हिंगणघाटपासून 15 किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन निघाला होता. मोर्चे, आंदोलन करुन जनतेने घटनेचा निषेध नोंदवला होता. हिंगणघाट जळीतकांडाचा आज निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने आज विकेश नगराळेला दोषी ठरवत उद्या शिक्षा जाहीर होण्याचे म्हटले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य घेत पोलिसांनी 19 दिवसांमध्ये 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण 64 सुनावणी घेत 29 साक्षीदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदविण्यात आले आहे. घटनेला दोन वर्षे झाली असून पीडितेच्या मृत्यूला 10 फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पीडितेच्या स्मृतीदिनाच्या दिवशीच आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची दाट शक्यता आहे. उद्या आरोपी विकेश नगराळेला न्यायालय काय शिक्षा सुनावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटनेला दोन वर्ष पूर्ण
हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील प्राध्यापिका असलेल्या फुलराणीला सकाळी हिंगणघाट येथे महाविद्यालयात जात असताना नंदोरी चाैकाजवळ एकतर्फी प्रेमातून विकेश तथा विकी नगराळे याने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना 3 फेब्रुवारी 2020 रोजी घडली होती. फुलराणीला तातडीने हिंगणघाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारांसाठी नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केले होते.
माझे दुःख शब्दात व्यक्त करु शकत नाही
माझ्या मुलीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आज न्यायालयाने आरोप सिद्ध केले आहेत. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील, पण माझे दुःख शब्दात व्यक्त करु शकत नाही. – सुषमा पिसुड्डे पीडितेची आई
मला कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद करू दिला नाही
माझ्या पक्षकाराने मृतक मुलीला पेट्रोल टाकून जाळले नाही. त्या बॉटलवर सुध्दा पक्षकाराचे बोटाचे ठसे आढळून आले नसल्याचा प्रयोग शाळेचा अहवाल आहे. हिंगणघाट न्यायालयात कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद करू दिला नाही, त्यामुळे उद्याला सुध्दा कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद करणार नसून, उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. माझ्या पक्षकाराची निर्दोष मुक्तता करण्यासाठी अपिल केली जाणार आहेत. असे आरोपीचे वकील भुपेंद्र सोने यांनी सांगितले आहे.

न्यायालय परिसरात तगडा बंदोबस्त
फुलराणीच्या मारेकऱ्यास बुधवारी काय शिक्षा होते हे जाणून घेण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्ताकरिता हिंगणघाट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक, 80 पोलिस शिपायी, दंगल पथक व नियंत्रण पथक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती हिंगणघाटचे पो.नि. संपत चव्हाण यांनी दिली.





