
अर्जुनी-मोरगाव : बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्रात येणार्या सर्व गावातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. वीज, शुध्द पाणी, शिक्षण, आरोग्य या बाबीच्या विकासासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. मतदारांनी आपल्यावर जो विश्वास दाखवून भरघोस मतांनी निवडून दिले, त्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. बोंडगावदेवी हे गाव तिर्थक्षेत्र आहे. त्यादृष्टीने आपण शक्य तेवढा लक्ष देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. अशी ग्वाही बोंडगावदेवी क्षेत्राचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी सत्कार समारंभ प्रसंगी दिली.
ग्रामपंचायत बोंडगावदेवी येथे आज बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नवनिर्वाचित पं.स. सदस्य कुंदा लोगडे, सरपंच प्रतिमा बोरकर, ग्रा.पं. सदस्य डाॅ.शामकांत नेवारे, अॅड.श्रीकांत बोरकर, अमरचंद ठवरे, माया मेश्राम, निराशा मेश्राम, ग्रामविकास अधिकारी समरीत तथा जि.प. हायस्कूलचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वप्रथम पाच लाख निधी अंतर्गत मंजूर गाव तलाव खोलीकरण कामाचा शुभारंभ जि.प. सदस्य लायकराम भेंडारकर व पंचायत समिती सदस्य कुंदा लोगडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर व पंचायत समिती सदस्य कुंदा लोगडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागातील कर्मचार्यांनी आपल्या विभागातील अडीअडचणी नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण टप्याटप्याने करु, असे आश्वासन जि.प. सदस्य लायकराम भेंडारकर यांनी दिले. सत्कार समारंभाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार अमरचंद ठवरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अॅड.श्रीकांत बनपुरकर यांनी मानले.





