
अर्जुनी-मोरगाव : बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूच्या भरमसाठ वाढणाऱ्या किमती, विविध शासकीय योजनांची न होणारी अंमलबजावणी, शेतकरी, शेतमजुरांच्या समस्यामुळे जनता होरपळून निघत आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा. या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. सदर निवेदनात नवीन अग्निपथ योजना बंद करून जुनी भरती प्रक्रिया कायम ठेवणे, गॅस सिलेंडरच्या किमती कमी करणे, पंतप्रधान आवास योजनेच्या निधी वेळेत देणे, सबरी योजनेचे उद्दिष्टात वाढ करून लाभार्थ्यांची लूट थांबवने, ग्रामीण भागातील बंद स्ट्रीटलाईट चालू करणे, नवीन रेशन कार्ड नोंदणीचे पोर्टल सुरू करणे, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान देणे, धानाला सातशे रुपये बोनस जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे, रासायनिक खतांच्या किमती मर्यादित ठेवणे, शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची तरतूद करणे, वनहक्क धारकांसाठी 75 वर्षाची अट शिथिल करून सरसकट वनहक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात यावे, या विविध मागण्यांच्या समावेश आहे.
निवेदनात समाविष्ट मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा. या विषयावर उपविभागीय अधिकाऱ्यांशी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्या. या वेळी पंस सदस्य चंद्रकला ठवरे, भागवत नाकाडे, सरपंच अशोक कापगते, नगरसेवक अतुल बनसोड, शीला उईके, माजी नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, माजी पंस सदस्य प्रमोद पाऊझगडे, प्रज्ञा गणवीर, संजय नाकाडे, इंद्रदास झिल्पे, सुभाष देशमुख, हितेश हत्तीमारे, लीलाधर ताराम, भाग्यश्री सयाम, धनपाल मेंढे आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.





