
आमगाव : तालुक्यात बोगस बियाणे, अप्रमाणित खत आणि जास्त दराने शेतीसामग्री विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील काही व्यापाऱ्यांकडून नकली बियाणे, अमानक व रासायनिक खत विकले जात आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार युरियासारख्या प्रतिबंधित खतांचीही खुलेआम विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, उत्पादनही धोक्यात आले आहे. बोगस बी-बियाणे व अमानक खत विकणाऱ्यांचे परवाने रद्द करून कठोर कारवाई करावी, युरिया खताची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी,
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी स्वतंत्र तपासणी समिती स्थापन व्हावी, नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, दुबार पेरणीसाठी शासकीय दर्जेदार बियाणे मोफत पुरवावे, लिंकिंग पद्धतीने खत विक्री करणाऱ्यांवर बंदी घालावी, शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, महात्मा फुले कर्ज प्रोत्साहन योजना २०१९-२० अंतर्गत प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित ५० हजार रूपये देण्यात यावे आदी मागण्यांसाठी निवेदन दिले. तसेच प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बहेकार, अॅड. दुष्यंत किरसान, जि.प. सदस्य उषा मेंढे, इसुलाल भालेकर, दिलीप टेंभरे, छबू उके, महेश उके, रवी राहंगडाले, पं.स. सदस्य तारेंद्र रामटेके, देवकांत बहेकार, गणेश हुकरे, जगदीश चुटे, राधाकिशन चुटे, डी. झेड. माहारवाडे, डॉ. गोरेलाल बिसेन, पिंकेश शेंडे, श्रीराम मेश्राम, देवीलाल केवट, रवींद्र मेश्राम, राधेलाल राहंगडाले, गोपाल पाउलझगडे, योगेश कोरे, भुवनेश्वर मेंढे, प्रेमसुख कटरे, राहुल चूटे, प्रदीप देशमुख, राजेश मच्छीरके, रामदास गायधने, इंदल पाथोडे, रामेश्वर श्यामकुवर, रामदास रामटेके, अभय देंगे, दिगंबर कोरे, मेघश्याम मेंढे, नरेंद्र बोहरे, रितेश चुटे यांचा समावेश होता.





