42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेले शौर्य हे आजच्या तरुण पिढीसाठी कायम प्रेरणादायी-...

कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेले शौर्य हे आजच्या तरुण पिढीसाठी कायम प्रेरणादायी- जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

0
51

blank

२६ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
वाशिम,दि.२७ जुलै -२६ जुलै १९९९… भारतीय सैन्याच्या शौर्याचा, त्यागाचा आणि पराक्रमाचा तो सुवर्णदिन ! कारगिलच्या पर्वतरांगांमध्ये, प्राणांची बाजी लावत आपल्या मातृभूमीसाठी लढलेल्या वीर जवानांनी हा विजय इतिहासात कोरून ठेवला. या दिवशी आपण केवळ एक युद्ध जिंकलं नाही, तर जगाला दाखवून दिलं की भारताच्या सैनिकांमध्ये हिमालयासारखा धैर्यगौरव आहे. कारगिल विजय दिन म्हणजे स्मरण, सन्मान आणि संकल्प यांचा संगम. शत्रूंच्या छाताडावर तिरंगा फडकवणाऱ्या त्या रणधुरंधरांना मानाचा मुजरा करण्याचा दिवस. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती होती, शौर्य होतं, आणि आपण सर्वांनी त्यांचं ऋण कायमच मान्य केलं पाहिजे.
आजचा दिवस म्हणजे वीर जवानांच्या अमर स्मृतींना उजाळा देण्याचा, त्यांच्या शौर्यकथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि देशासाठी काहीतरी करण्याचा निर्धार पुन्हा एकदा जागवण्याचा दिवस आहे.
      कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेले शौर्य हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना सदैव स्मरणात ठेवावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.
     कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी उपस्थित माजी सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, माजी सैनिकांनी जमीन विषयक कोणतीही अडचण असल्यास ती प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रत्येक सोमवारी तहसील कार्यालयात ‘वत्सगुल्म शेतीसंवाद’ १२ ते १ या वेळेत घेतला जातो. या माध्यमातून माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.
      जिल्हा प्रशासन माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे आणि त्यांची सेवा, त्याग सदैव स्मरणात ठेवली जाईल.असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी यावेळी सांगितले.
     शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.या दिवसाच्या सन्मानार्थ आजचा २६ वा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहीदांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
        यावेळी परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा,निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी उपस्थित वीर पत्नी शांताबाई सरकटे, पार्वतीबाई लहाने, मिराबाई नागुलकर, शोभाबाई भालेराव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.माजी सैनिकांनी कारगिल युद्धाच्या आठवणी व अनुभव व्यक्त केले.
       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत माजी सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी माजी सैनिकांना आवाहन केले की, जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. ते पुढे म्हणाले की, जिल्हा सैनिक कार्यालयाने माजी सैनिकांच्या नोंदीचे कामकाज ऑनलाईन स्वरूपात पूर्ण करावे. अभिलेखांचे डिजिटायझेशन करून दस्तऐवज व्यवस्थित साठवावेत. माजी सैनिकांच्या विविध मागण्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करावेत. आम्ही त्याचा शासनदरबारी पाठपुरावा करू.असेही सांगितले
         कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक संजय यलमर, वरिष्ठ लिपिक शिवशंकर झाडोकार, लिपिक माणिक इंगळे, रविंद्र डोंगरदिवे यांच्यासह माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या वीर पत्नी आदी उपस्थित होते.

blank