
गोंदिया : सरकार शेतकऱ्यांना समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्नशील आहे; तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकांकडून वेळेवर कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे कठीण होत आहे. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी फारच सुमार आहे. परिणामी शेतकऱ्यांना वारंवार पायपीट करावी लागत आहे. यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त करीत राष्ट्रीय बँकेच्या अधिकाऱ्यांचे कान टोचत पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यास सांगितले.
स्थानिक पंचायत समिती येथे ४ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपाचा आढावा घेण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील को ऑपरेटिव्ह सोसायट्या, ग्रामीण बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी वाटप केलेल्या पीक कर्ज वितरणाची माहिती घेतली. यात ग्रामीण बँक वगळता इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ १० टक्के कर्जच शेतकऱ्यांना वितरित केल्याचे पुढे आले. यावर आमदार अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. तसेच निर्धारित कालावधीत पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सेवा सहकारी सोसायट्यांचे जे शेअर्स बँकेत ठेवले जात होते, ते आता सोसायट्यांमध्येच ठेवले राहणार असल्याचे सांगितले. जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, ते लवकरच होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करतील. सोसायटी आणि बँक यांच्या नोंदींमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीसुद्धा बँकेला सूचना करण्यात आल्या आल्या आहेत. जीडीसीसी बँक यावर सकारात्मक पावले उचलेल. तसेच नवीन सभासदांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आढावा बैठकीला पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, सहकारी संस्थांचे सहायक निबंधक रोकडे, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी पिंगळे, एपीएमसीचे संचालक ठाकूर, पंचायत समितीचे सदस्य शंकर टेंभरे, ववीर इनायत उपस्थित होते.





