
अकोला,दि.२९ः जिल्ह्यातील बाळापूर तहसील कार्यालय अंतर्गत नया अंदुरा ह्या गावात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या “सतीश सुभाष कराड”ला आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास तब्बल एक लाख रुपयांची लाच घेत असताना अकोला व बुलढाणा एसीबीच्या संयुक्त पथकाने निंबा फाट्यावर “रंगेहाथ पकडून” ताब्यात घेतले आहे.
अंदुरा येथील एका शेतकऱ्याच्या शेताच्या गटाच्या नंबरची दुरुस्ती करण्याकरिता ह्या सतीश सुभाष कराड नामक तलाठ्याने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.मात्र तक्रारदाराला ही लाचेची रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने आज सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती.अकोला एसीबीचे अधिकारी न्यायालयीन कर्तव्य आणि दुसऱ्या एका प्रकरणात गुंतलेले असल्याने बुलढाणा एसीबीच्या अधिकाऱ्यांची ह्या कारवाईत मदत घेण्यात आली आहे.अकोला एसीबीचे पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा एसीबीचे पोलिस निरीक्षक विलास भुशिंगे व पो.अंम.रणजीत व्यवहारे तसेच अकोल्यातील पो.अंम.संदीप ताले यांनी निंबा फाट्यावरील शेगाव रस्त्यावर हा सापळा लावला असता तलाठी सतीश कराड ह्याला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची मागणी करून एक लाखाचीच लाच स्वीकारत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक केली आहे.ह्यात अकोला एसीबीचे पोलिस अंमलदार संदीप ताले ह्यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली आहे.आज दिनांक २९/९/२०२५ ला दुपारी साडे चार वाजताच्या दरम्यान लाचखोर तलाठी सतीश सुभाष कराड ह्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर उरळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.





