
उदगीर: महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालय उदगीर येथील खेळाडू कु. केतकी चवळे यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नांदेड येथे संपन्न झालेल्या शालेय विभागीय 19 वर्षाखालील तलवारबाजी ( क्रीडा प्रकार सेबर ) स्पर्धेत सांघिक प्रथम तर वैयक्तिक तृतीय क्रमांकाने विजेतेपद पटकावले आहेत. या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते कु. केतकी चवळे यांचा ग्रंथ, शॉल व बुके देऊन सत्कार करण्यात आला व पालक विजयकुमार चवळे यांचाही संस्था व महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य प्रा. शिवशंकर कोडचे, डॉ. कमलाकर गव्हाणे उपस्थित होते. सदर खेळाडूची संभाजीनगर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूला क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे, प्रा. रमजू शेख यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल खेळाडूचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





