
तिरोडा – मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या तिरोडा-खैरलांजी मार्गावर आजही चक्काजामची समस्या अधिकच गंभीर बनली असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. रेती व अदानीच्या राखेची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या (मोठे टिप्पर व ट्रक) बेफाम ये-जाेमुळे राणी अवंतीबाई चौक ते तेलटाकी व पुढे प्रेमबंधन लॉनपर्यंत रस्त्यांवर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
विशेषतः रविवारीच्या आठवडी बाजाराच्या दिवशी ही समस्या भीषण रूप धारण करते. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना वाहतूक कोंडीतून जाणे-अगदी चालत जाणेसुद्धा मोठे संकट ठरत आहे. अनेकदा अर्धाअर्धा तास वाहने अडकून पडतात, प्रसंगी रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहनांना मार्गच मिळत नाही, अशा गंभीर तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
स्थानिक व्यापारी वर्गातही तीव्र नाराजी पसरली असून, “बाजारपेठेतील व्यवसायावर याचा थेट परिणाम होत आहे. ग्राहकांना वेळेवर पोहोचता येत नाही; अनेक जण कोंडी पाहून परत फिरतात,” असा आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की, किमान रविवारी तरी अवजड वाहनांना बाजारपेठेतील मुख्य मार्गावरून प्रवेशबंदी करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी दिला आहे.
स्थानिक प्रशासनाकडून या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देऊन उपाययोजना केल्या जाण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.





