35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता गौण खनिज तस्करी प्रकरणात पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त

गौण खनिज तस्करी प्रकरणात पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त

0
109

blank

आमगाव : गौण खनिजाचे (मुरूम) खनन करून सर्रास वाहतूक केली जात असताना आमगाव पोलिसांनी धाड टाकून पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त केला आहे. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत सितेपार शिवारातील नवातलावजवळील पहाडीवर रविवारी (दि. ४) दुपारी १२:५० वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
सितेपार शिवारातील नवातलावजवळील पहाडीवर मुरमाचे खनन करून वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती आमगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने गावातील दोन पंचांना बोलावून त्यांना माहिती देत सितेपार शिवारात नवातलावजवळील पहाडीजवळ दुपारी १२:५० वाजता धडक दिली. तेथे पहाडीच्या पायथ्याशी पिवळ्या रंगाच्या जेसीबीने खोदकाम सुरू होते व हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत मरूम भरला जात असल्याचे दिसले. तर जवळच एका मागे एक असे चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभे होते. गौण खनिज खोदकाम करण्याचे व वाहतुकीकरीता शासनाकडून निर्गमित केलेला कोणताही पास परवाना न बाळगता अवैधरीत्या खनन केले जात असल्याने पथकाने एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर जप्त केले.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नामे आकाश रामदास डोये (२२, रा. मोरवाही), विजय खेमचंद पाथोडे (२५, रा. सितेपार), राकेश सरजलाल राखडे (२८, रा. करंजी), भास्कर हरिराम बिसेन (२९, रा. सितेपार), पंकज घनश्याम बिसेन (२७, रा. सितेपार) तसेच संदीप रतिराम हत्तीमारे (३१, रा. कार्तुली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पथकाने घटनास्थळावरून विना क्रमांकाचे चार ट्रॅक्टर अंदाजे किमत २४ लाख रुपये तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एआर २२८९, ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी ९७५१, ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एआर ७६०७ आणि एक विना क्रमांकाची ट्रॉली एकूण किंमत आठ लाख रुपये; ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी ५४४७ अंदाजे किमत लात लाख रुपये व विना क्रमांकाची ट्रॉली अंदाजे किमत दोन लाख रुपये तसेच जेसीबी मशीन अंदाजे किमत २० लाख रुपये असा एकूण ६५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
तसेच सहा जणांवर भान्यासं कलम ३०३ (२), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देवीदास ठमके करीत आहेत.ही कामगिरी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोनि. राणे, पोउपनि. ठकमे, हवालदार मेश्राम, चौधरी, पंधरे, असीम मन्यार, शिपाई चेतन शेंडे, भागवत कोडापे, गिरीया व चालक शिपाई इंगळे यांनी केली आहे.

blank