
■ देवरी येथील एमआयडीसी परिसरातील सुफलाम कंपनी नजीकची घटना
देवरी, दि.१५ः उभ्या टैंकरला मागून धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर झाल्याची घटना आज रविवार(दि. १५ फेब्रुवारी) रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान देवरी येथील एमआयडीसी परिसरातील सुफलाम कंपनी नजीकच्या परसटोला रस्त्यावर घडली.
यातील गंभीर जखमीचे नाव अनुज कैलास मेश्राम (वय १५) रा. वार्ड क्र. १३ संजयनगर, देवरी असे आहे. जखमीला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुचाकी चालक अनुज आपल्या दुचाकी क्र. एम. एच. ३६ आर ६५२२ वर स्वार होऊन एमआयडीसी अंतर्गत असलेल्या परसटोला रस्त्यावरून जात होता. याच मार्गावर सुफलाम कंपनी असून परसटोला मार्गावर ट्रकांच्या खूप मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या असतात. अशातच कंपनीमध्ये आलेला टँकर क्रमांक के. ए. ०१ ए. पी. १३०० रस्त्याच्या बाजूला उभा होता. दुचाकी चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या टँकरला मागून जोरदार धडक दिली.
देवरी पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.
अल्पवयीन दुचाकी चालकांचे शहरात प्रमाण वाढले; वाहतूक पोलिस गांभीर्य शून्य
चालक परवाना नसतांनाही युवक सर्रास दुचाकी चालवत आहेत. त्यांना हटकण्यापलीकडे पोलिस काहीही करत नाहीत. अद्याप या धूम स्टाईल तरुणावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ नाममात्र दंड करण्यापलीकडे कारवाई होत नसल्याने युवकांची हिंमत वाढत चालली आहे. परिणामी, ठिकठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता खरी गरज आहे ती यांच्यावर कारवाईचा करण्याची.
परसटोला मार्गावर वाहनांचा रांगाच रांगा; कारवाईची गरज.
देवरी शहरातील एमआयडीसी अंतर्गत जाणाऱ्या परसटोला मार्गावर सुफलाम कंपनी स्थापन झाल्याने, कच्चामाल पुरविणाऱ्या कंपनीला परसटोला मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असतात. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.





