
गडचिरोली, दि. 29 – अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करू नये, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकात असेही म्हटले आहे की, ”सीआरपीएफचे जवान हे मानवाधिकाराचे शत्रू आहेत. त्यांना बस्तरमधील आदिवाशांना संपवण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. अशातच या लोकांना मदत करणा-यांचा आम्ही निषेध करतो आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पुन्हा मदत करू नये, असा इशाराही देत आहोत, नाही तर परिणाम वाईट होतील”.ही पत्रके गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात आढळली आहेत.
छत्तीसगडमधील सुकमा येथे मार्च महिन्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. या शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची घोषणा अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांनी केली होती. त्यानुसार अक्षयनं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 9 लाख रुपये तर सायना नेहवालनं प्रत्येक कुटुंबाला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करणारी पत्रके वाटली आहेत. पत्रकात ”पीपल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला आर्मी”नं अक्षय व सायनानं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेल्या आर्थिक मदतीचा निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करु नये अथवा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली आहे.





