
कोरची,दि.17ः- येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एम.देवरे यांच्या विरोधात बुधवारला झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सवार्नुमते अविश्वास ठराव पारित करण्यात आला.
चार सदस्यीय कोरची पंचायत समितीत काँग्रेसचे दोन आणि शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक सदस्य आहे. पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मासिक सभा घेण्यात आली. या सभेत उपसभापती सुशीला जमकातन, सदस्य सदाराम नुरुटी व कचरीबाई काटेंगे, गटविकास अधिकारी डी.एम.देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच पंचायत समिती सदस्य सदाराम नुरुटी यांनी गटविकास अधिकारी डी.एम.देवरे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवला. कोणतेही काम करताना पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे, कोरोनामुळे लॉकडाऊन असताना तब्बल ३५0 कर्मचा-यांना बोलावून वृक्षारोपण करणे इत्यादी अविश्वासाची कारणे श्री.नुरुटी सभागृहाला सांगितली. बीडीओ देवरे यांनी वर्षभरात सात महिने ९0 किलोमीटर अंतरावरील भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथून कोरची येथे ये-जा केली. पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावांचीही ते अंमलबजावणी करीत नाही, असेही आरोप पंचायत समिती सदस्यांनी केले.
जोपयर्ंत श्री.देवरे यांच्यावर कारवाई होत नाही; तोपयर्ंत कोणताही सदस्य मासिक सभेला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका सदाराम नुरुटी यांनी मांडली. त्यांच्या भूमिकेला सर्व सदस्यांनी पाठिंबा देत अविश्वास प्रस्ताव पारित केला.





