गुंडाचा खून करणारे आरोपी गजाआड

0
565

भंडारा=नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून अभिवचन रजेवर सुटून आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करुन खून करणार्‍या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता.१६) अटक केली आहे.
सुधाकर रामटेके (४८) रा. शहापूर या कुख्यात गुंडाचा २५ ऑक्टोबर रोजी दसर्‍याला गोपिवाडा शिवारात खून करण्यात आला होता. याप्रकरणी सोनिक अरूण मेर्शाम (१९) रा. गोपेवाडा व अभिषेक प्रमोद मेर्शाम (२१) रा. शहापूर यांना अटक करण्यात आली आहे.
सुधाकर रामटेके हा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून अभिवचन रजेवर सुटून आला होता तसेच शहापूर येथे पानटपरी चालवित असताना शहापूर येथे दहशत पसरविणे सुरू केले होते. एकेदिवशी सोनिक मेर्शाम याच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने सुधाकरने सोनिक व त्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
याच कारणावरून सोनिकने त्याचा चुलतभाऊ अभिषेक मेर्शाम याच्या मदतीने प्रथम २३ ऑक्टोंबरच्या रात्री जिवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, त्यावेळी सुधाकर हजर नव्हता. त्यानंतर २५ ऑक्टोबरच्या पहाटे १.३0 वाजता त्याच्यासोबत आरोपींनी नशा केली. त्यानंतर घरी जाण्याच्या बहाण्याने सोनिक व अभिषेक निघाले. परंतु, घरी न जाता अंधारात दबा धरून त्याच्यावर पाळत ठेऊन होते. अंदाजे २.३0 वाजता सुधाकर पानटपरीवर नशेत धुंद होऊन झोपला असल्याचे दिसताच दोन्ही आरोपींनी दारू प्यायला चला असे म्हणून दुचाकीवर बसवून गोपेवाडाच्या नहराजवळ घेऊन गेले. तेथे आणखी दारू पाजली व नशेत बेधुंद करून धारदार शस्त्राने पोटावर व मानेवर वार करुन त्याची हत्या केली.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळ गाठले व गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिस स्टेशनची चार तपास पथके नेमली. २२ दिवस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडताळणी केली. गुप्त माहितीच्या आधारे सोनिक मेर्शाम व अभिषेक मेर्शाम यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यातील धारदार शस्त्राची विल्हेवाट लावल्याचे सांगितले.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे, पोलिस उपनिरीक्षक सुनिल व्ही. उईके, पोलिस हवालदार तुळशीदास मोहरकर, पोलिस शिपाई प्रदिप डहारे, किशोर मेर्शाम, अमोल खराबे, शैलेश बेदुरकर, ईश्‍वरदत्ता मडावी, पंकज भित्रे, सचिन देशमुख, जवाहरनगरचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. बारसे, पोलिस हवालदार मिलिंद जनबंधू, पोलिस नायक बलिराम उईके, पोलिस शिपाई दुर्गाप्रसाद वैरागडे, संदिप बंबावले, योगेश घाटोळे यांनी केली.