भरदिवसा चाकूने पाठ, छाती व गळ्यावर वार करून केले गंभीर जखमी

0
224

गोंदिया, दि.23 : गोंदियात गुन्हेगारीची शृंखला सुरू झाली आहे. शहरातील गणेशनगरात एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेचे पडसाद निवळले नसतानाच पुन्हा गोंदियात हाफ मर्डरची घटना घडली. गोंदिया शहरातील एका युवकाची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठ, छाती व गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या गड्डाटोली परिसरात रविवार, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, जखमी युवकाचे नाव गोल्डी आरोग्यस्वामी विलियम (वय 22) रा. गड्डाटोली गोंदिया असे आहे. जखमी युवक, आरोपी व त्याच्या दोन मित्रांसह गड्डाटोली पुलाच्या खाली चर्चा करीत होते. तेव्हा जखमी युवक व आरोपी यांच्यात शाब्दिक वादविवाद झाला. दरम्यान गोल्डी विलियमने आरोपीला झापड मारली. यावर संतापून आरोपीने आज तुला संपवूनच टाकतो, असे बोलून कमरेखाली ठेवलेला धारदार चाकू काढला. त्या चाकूने गोल्डीच्या गळ्यावर वार केला. गोल्डी खाली पडताच आरोपीने हत्या करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याच्या पाठ व छातीवर वार केले आणि पसार झाला.

या घटनेनंतर गोंदिया पुन्हा कंपित झाला. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच गणेशनगरात झालेल्या अशोक कौशिक यांच्या हत्या प्रकरणाला घेवून रोष व्याप्त आहे. अशा गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने योग्य पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.

सदर घटनेबाबत फिर्यादी क्रिस्टीना राकेश बादल (वय 26) रा. सुखदेव वॉर्ड, गड्डाटोली, गोंदिया यांच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षणावरून रामनगर पोलिसांनी भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोने करीत आहेत.