भांडी साफ करतकरता केले दागिन्यांवर हात साफ

0
39

 तिरोडा, दि.1 : चोरी-घरफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठगबाजीनेही डोके वर काढले आहे. भांडी साफ करण्यासाठी मोटारसायकलने घरी आलेल्या दोन ठगबाजांनी किंमती दागिन्यांवर हात साफ केले आणि पसार झाले. ही ठगबाजी मंगळवार, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ग्राम काचेवानी येथे घडली. कमल किशोर सूर्यवंशी (वय 38) रा. ग्राम मल्हार, तालुका मस्तूरी, जिल्हा बिलासपुर, ह.मु. काचेवानी ता. तिरोडा असे फिर्यादीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीच्या घरासमोर मोटारसायकलने दोन व्यक्ती येवून थांबले. त्यानंतर आम्ही भांडी साफ करणार्‍या कंपनीचे लोक असून तुम्हाला जर भांडी साफ करायचे असेल तर आणा, असे फिर्यादी सूर्यवंशी यांच्या पत्नीला म्हणून विश्वासात घेतले. यावर तिने तांब्याचे पात्र साफ करण्यासाठी त्यांना दिले. त्यानंतर ठगबाजांनी भांड्यात पाणी मागितले व पावडरने तांब्याचे पात्र साफ-स्वच्छ करून परत केले.

असे घडले प्रकरण : दागिन्यांवर हात साफ

यानंतर ठगबाजांनी त्या महिलेला विश्वासात घेवून अशाचप्रकारे सोन्याचांदीचे दागिने सुद्धा साफ करून देत असल्याचे सांगितले. यावर त्या महिलेने सदर ठगबाजांना सोन्याचे कानातील दोन झुमके (वजन 5 ग्राम), गळ्यातील सोन्याचा लॉकेट (5 ग्राम), एक सोन्याची अंगठी (3 ग्राम) असे दागिने दिले.

ठगबाजांनी तांब्याच्या पात्रात दागिने व हळदीसह पावडर घातले. त्यानंतर त्यांनी महिलेला गरम पाणी आणण्यास सांगितले. महिला गरम पाणी आणण्यासाठी स्वयंपाक खोलीत जाताच दागिन्यांवर हात साफ केले व पसार झाले. महिलेने तांब्याचे पात्र उघडून बघताच त्यातील दागिने गायब असल्याचे दिसले. तेव्हा सदर महिलेला ठगांनी आपली फसवणूक केल्याचे समजले.

या घटनेची माहिती तिने कुटुंबियांना दिली. त्यानंतर पती  कमलकिशोर सूर्यवंशी यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिरोड़ा पोलिसांनी अज्ञात ठगबाजांविरुद्ध भादंविच्या कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. सदर दागिने जवळपास 50 हजार रुपये किंमतीचे असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार बरय्या करीत आहेत.