रेल्वे गाडीतून ₹1.19 लाखांचा गांजा जप्त

0
36

नागपूर, दि.4 : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॉटफार्म-1 वर गस्त घालत होते. दरम्यान प्लॉटफार्मवर थांबलेल्या विशाखापट्टणम न्यू दिल्ली एक्सप्रेसमध्ये त्यांना एक बेवारस बॅग आढळती. कुणीही मालकी हक्क न सांगितल्याने त्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात असलेला तब्बल ₹1.19 लाखांचा गांजा जप्त करण्यात आळा.

सविस्तर असे की, रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये अवैधरित्या अंमली पदार्थांची वाहतूक होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी आदेश दिले. तसेच स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूरचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांनी आपल्या स्टाफला सूचना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार सावजी, पोलीस नायक धोटे, खोब्रागडे, पोलीस शिपाई गजवे, राऊत, मसराम यांची नागपूर रेल्वे स्थानकात गस्त लावण्यात आली होती.शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकातून जाणार्‍या (02805) विशाखापट्टणम न्यू दिल्ली एक्सप्रेसमधून गांजाची अवैध वाहतूक होत आहे, अशी माहिती गुप्त बातमीदाराने दिली. दुपारी 2.30 वाजता सदर गाडी नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॉटफार्म-1 वर आली. त्यावेळी सदर माहितीवरून पोलीस अधिकारी व स्टाफने गाडीत गस्त घातली. दरम्यान गाडीच्या कोचमधील (बी/5 व बी/6) कपलिंगमध्ये एक बेवारस बॅग मिळून आली.

अशी केली कार्यवाही : गांजा जप्त 

त्या बॅगबद्दल कोणीही मालकी हक्क न सांगितल्याने सदर बॅग प्लॉटफार्म-1 वर उतरवून तपासणी करण्यात आली. त्यात 1 लाख 19 हजार 400 रुपये किंमतीचा 11 किलो 940 ग्राम गांजा मिळून आला. सदर गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे व स्टाफ यांनी रीतसर कार्यवाही केली. तसेच पुढील तपासासाठी रेल्वे पोलीस नागपूर यांच्या ताब्यात दिले. गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.सदर कामगिरी पोलीस अधीक्षक एम राजकुमार व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार सावजी, पोलीस नायक येळेकर, पोलीस नायक धोटे, खोब्रागडे, गजवे, राऊत, मसराम यांनी केली.