विलय दिनाचे बॅनर लावणारा नक्षलवादी पोलिसांच्या ताब्यात

0
34

गडचिरोली,दि.20- 21 सप्टेंबर हा नक्षलवादी विलय दिन असून त्याच्या प्रचारार्थ बॅनर लावणारा जनमिलीशीया सदस्य पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. गडचिरोली पोलीस जवानांनी नक्षल बॅनर लावतांना रंगेहात पकडले आहे. लालसु चैतु मट्टामी रा. तुमरकोडी असे पकडण्यात आलेल्या जनमिलीशीया सदस्याचे नाव आहे. तो कोठी जंगल परिसरात विलय दिनाचे बॅनर लावताना आढळून आला.

21 सप्टेंबर रोजी नक्षलवादी विलय दिन साजरा करतात. त्या पार्श्वभुमीवर नक्षलवादी जिल्ह्यातील विविध भागात हिंसक कारवाया करीत आहेत. अतिदुर्गम गावामध्ये नक्षलवाद्यांचे स्थानिक संघटन जनमिलीशीया कार्यरत असुन अटक करण्यात आलेला लालसु मट्टामी हा जनमिलीशीया सदस्य आहे. पोलीसांकडुन त्याला नक्षलवाद्यांना मदत न करण्याबाबत वारंवार सुचना देण्यात आल्या होत्या. तरीही तो पोलीसांचे सांगणे ऐकुन न घेता नक्षलवाद्यांना मदत करीत होता. सोमवार ला कोठी जंगल परिसरात नक्षलवाद्याच्या विलय दिनाच्या निमित्ताने सामान्य जनतेमध्ये दहशत पसरविण्यासाठी नक्षल बॅनर लावत असताना आढळून आला. त्याचे कडुन नक्षल बॅनर व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले असुन त्याच्यावर अटकेची कार्यवाही सुरु आहे.

नक्षलवाद्यांच्या 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, पोलीस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले (अभियान), सी-60 चे प्रभारी अधिकारी सपोनि अभिजीत पाटील यांचे नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात नक्षविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन  भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवने व पोमके कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि  महेश घुगे यांनी अथक परीश्रम घेतले आहे.पोलीस अधीक्षक यांनी नक्षलवाद्यांच्या विलय दिन सप्ताहाला कोणतेही सहकार्य न करता जोरदार निषेध करावा असे जनतेला आवाहन केले आहे.