जावयाने सासर्‍याला कालव्यात ढकलले

0
43

पवनी- जावयाने सासर्‍याला गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात ढकलले. यात सासर्‍याचा बुडून मृत्यू झाला. तर मृतदेह बाहेर काढण्यासाठी मृतकाचा भाऊ कालव्यात गेल्याने त्याचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील सिंधी येथे सोमवारी उघडकीस आली.
हरी गोविंदा नागपुरे (६५) व चंद्रभान गोविंदा नागपुरे (५५) दोघेही रा. सिंधी अशी मृतकांची नावे आहेत.
हरी नागपुरे हे वाही येथे लग्न समारंभाकरिता रविवारी गेले होते. लग्न आटोपून गावाकडे परत येत असताना त्यांचा जावई अनिल नारायण हटवार (४३) रा. वाही याने मोटर सायकलने गावाला सोडून देतो, म्हणून त्यांना गाडीवर बसविले. उजव्या कालव्याच्या मार्गाने जात असताना मनात पूर्वीच ठरवून असल्याने लघुशंकेच्या बहाण्याने अनिलने गाडी थांबविली. त्यानंतर सासरे हरी गोविंदा नागपुरे यांना बळजबरीने कालव्यात ढकलून दिले. त्यानंतर जावई अनिल हा वलगी या गावी गेला. तिथे असलेल्या मेहुणीला ‘मी तुझ्या बापाला नहरात बुडवून मारले. आता तुझ्या भावाला मारतो.’ असे सांगितले. तेव्हा घाबरलेल्या मेहुणीने वडिल गावी पोहाचले किंवा नाही, याची शहानिशा केली. वडिल घरी आले नसल्याचे कळताच अनिलने सांगितलेला वृत्तांत माहेरच्या मंडळींना तिने सांगितला. हा प्रकार गावात माहिती होताच कालव्याच्या पाण्यात हरी नागपुरे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आज सोमवारी सकाळी हरी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यास पोलिस व ढिवर बांधव जाण्यापूर्वीच हरी यांचा लहान भाऊ चंद्रभान कालव्याजवळ पोहोचला. पाण्यात भावाचा मृतदेह तरंगताना पाहताच मनावरचा ताबा सुटल्याने भावाचा मृतदेह काढण्याकरिता त्याने नहरात उडी घेतली. काही वेळ पोहत मृतदेहाजवळ पोहोचला. मात्र पोहण्यात तरबेज नसल्याने चंद्रभानचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटनेची पवनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी जावई अनिल नारायण हटवार यास अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चिलांगे अधिक तपास करीत आहेत