वाळू तस्कराने तहसीलदाराच्या अंगावर घातले टिप्पर 👉बचावासाठी तहसीलदारांनी केला हवेत गोळीबार

0
58

भंडारा – जिल्ह्यात वाळु तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर टिप्पर घालून जीव घेण्याचा प्रयत्न वाळु तस्कराने केला. तहसीलदारांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केली. बुधवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून भंडारा जिल्ह्यातील वाळु तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हवेत 2 गोळ्या झाडल्या

प्राणघातक हल्ल्यातून जीव वाचविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या तहसीलदारांनी त्यांच्याजवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरींग केले. वाळू तस्करांनी जेसीबीच्या पंजाने तहसीलदार दीपक कारंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाळू तस्करांचा हा प्रयत्न लक्षात येताच तहसीलदारांनी दोन गोळ्या फायर केल्या आहे. या प्रकरणी तहसीलदार यांच्या तक्रारीवरुन जेसीबी व टिप्पर चालक, मालक यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जेसीबी चालकाला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे.

👉रोहा गावात वाळूचोरीचा प्रयत्न

बुधवारी मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी तस्करांनी साठवलेली वाळू जेसीबीद्वारे टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार कारंडे यांनी त्यांच्या चमूसह रोहा या गावात भेट दिली. तेव्हा जेसीबीद्वारे टिप्परमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. दरम्यान, तहसीलदार यांनी ते काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी, असे आवाहन जेसीबी चालकाला केले. मात्र, जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याद्वारे हल्ला चढविला.

👉दोनदा हल्ल्याचा प्रयत्न

तहसीलदारांनी गोळीबार करुन स्वतःचा बचाव केल्यानंतर चालकाने तिथून जेसीबी घेऊन पळ काढला. दरम्यान, तहसीलदारांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे तहसीलदार यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून दोनदा गोळीबार केला.

👉आणखी लोकांवर कारवाईची शक्यता

गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदार यांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीबी आणि टिप्पर ताब्यात घेतले आहे. मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी चालक, मालक, तसेच टिप्पर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम 353, 379 नुसार गुन्हा नोंद केला असून सध्या जेसीबी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी सांगितले.