नवजात बाळाची तस्करी करणार्‍या जोडपीस अटक

0
18

चंद्रपूर- अहमदाबादवरून विजयवाडा येथे नवजात बालकाची तस्करी करणार्‍या जोडप्याला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. सदर कारवाई रेल्वे पोलिसांनी केली असून त्यांच्या सतर्कतेमुळे बालक सुरक्षित आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २५ डिसेंबर रोजी आर.पी.एफ. व जी.आर.पी. बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन एक्सप्रेसच्या (गाडी क्र. १२६५५) डब्बा क्र. एस-३ मध्ये आरपीएफचे कर्मचारी व रेल्वे चाईल्ड लाईनच्या कर्मचार्‍यांनी तपासणी केली असता, बर्थ क्रमांक २३ वर एक जोडपी संशयास्पद स्थितीमध्ये दिसून आले. त्यांच्याकडे अंदाजे दोन ते तीन महिन्यांचे नवजात बालक आढळून आले. सदर बालकाबाबत माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ते बाळ स्वत:चे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जोडप्याच्या वर्तणुकीवरून ते बाळ त्यांचे नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आरपीएफ बल्लारपूर यांनी सदर जोडप्याला बल्लारपूर रेल्वे स्टेशनला उतरवून पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्यांची विचारपूस केली असता पुरुषाने आपले नाव चंद्रकांत मोहन पटेल (वय ४0, रा. इंदिरानगर, संगम सोसायटी, राणी सती मार्ग, मलाड ईस्ट, मुंबई) तर महिलेने आपले नाव द्रौपदी राजा मेर्शाम (वय ४0, पत्ता – आयबीएम रोड, धम्मनगर, गिट्टीखदान, काटोल रोड, नागपूर) असे सांगितले. त्यांच्यासोबतच दोन महिन्याचे असलेले बाळ त्यांचे नसल्याचीही कबुली त्यांनी दिली.
रेल्वे तिकिटाबाबत विचारले असता अहमदाबाद ते विजयवाडा इथपयर्ंतचे जनरल तिकीट नंबर डी-२४ १२ ९२ ७३ व डी-२४ १२ ९२ ७४ सादर केले. संशयावरून त्यांचा मोबाईल तपासण्यात आला. त्यामधील रेकॉर्ड व व्हॉट्सअप चॅटिंगवरून स्पष्ट झाले की, सदर बाळ हे अहमदाबादवरून तस्करी करून विजयवाडा येथे घेऊन जाण्यात येत होते. महिलेला अधिक विचारपूस केली असता संशयित व्यक्तीने बाळाला सोबत घेऊन जाण्याचे पाच हजार रुपये दिले होते, असे सांगितले. तर सोबत असलेल्या संशयित व्यक्तीला विचारले असता अहमदाबाद स्टेशनवर मला दोन व्यक्तीने बाळाला विजयवाडा येथे पोहोचून देण्याची जबाबदारी दिली होती, अशी कबुली दिली. वरील प्रकरणाबाबत दोन्ही व्यक्तिंनी बरीच माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. आरपीएफ बल्लारपूरचे उपनिरीक्षक प्रवीण महाजन, महिला हेड कॉन्स्टेबल आरती यादव, आरपीएफ चंद्रपूरचे प्रवीण गाढवे, पोलिस उपनिरीक्षक ए.एस.अली तसेच डी. गौतम, अखिलेश चौधरी यांनी कारवाईत भाग घेतला. रेल्वे चाईल्ड लाईन यांच्याकडे बाळ तात्पुरते ठेवण्यात आले. बाळाची माहिती मिळताच बालकल्याण समिती चंद्रपूर आणि अजय साखरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी घटनास्थळी पोहोचली. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक के.एन. रॉय चंद्रपूर यांच्याद्वारे दोन्ही संशयित व्यक्तीवर रात्री उशिरा भारतीय दंड संहितानुसार कलम ३७0 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दि. २६ रोजी सदर बाळाला बालकल्याण समिती समोर उपस्थित करून तात्पुरता दाखल आदेश देण्यात आला.