Home गुन्हेवार्ता प्रवासी वाहनाची दुचाकीला धडक : दोन जागीच ठार

प्रवासी वाहनाची दुचाकीला धडक : दोन जागीच ठार

0

कोरची -येथून प्रवासी घेऊन कुरखेडाकडे जात असलेल्या प्रवासी वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व प्रवाशी वाहनातील एक महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी दुपार दोन वाजताच्या सुमारास कोरची मुख्यालयापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर मोहगाव नजीक घडली. छबिलाल सोरी रा. मोहगाव असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून प्रवासी वाहनातील एका मृत महिलेचे नाव कळू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारीच्या सुमारास कोरची येथून एमएच 0४ बीक्यु १९२४ या क्रमांचे महिंद्रा कंपनीचे वाहन प्रवासी घेऊन कुरखेडाकडे भरधाव वेगाने जात होते. तर छबिलाल सोरी हा सीजी 0८ एफ ३२१७ या क्रमांकाच्या दुचाकीने कोरचीकडे जात होता. दरम्यान मोहगाव नजीक भरधाव जाणार्‍या प्रवासी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यात दुचाकीस्वाराचा जागाचा मृत्यू झाला. तर प्रवासी वाहनातील एक महिलाही जागीच ठार झाली. तर प्रवासी वाहनातील ९ जण जखमी झाले. प्रवासी वाहनामध्ये दोन चिमुकल्या समवेत दहा प्रवाशी होते. अंजना मडावी (२६) रा. पड्यालजोब , उसन लाडे (५२) रा. कराडी, नामदेव तुलावी (२८) रा. लवारी, पूजा तुलावी (२५) रा. लवारी, युग तुलावी (५ महिने) रा. लवारी, जयश्री फुलकुवर (२४) रा. पांडूटोला, सोनल फुलकुवर (३४) रा. पांडूटोला,रश्मी मडावी (३५) रा. बेळगाव, राशी मडावी (९) रा. बेळगाव असे अपघातग्रस्तांचे नाव नावे आहेत. यातील मृत्यू झालेल्या महिलेची ओळख पटू शकली नव्हती.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे, वसीम शेख, सुरज हेमके, आशिष अग्रवाल, राष्ट्रपाल नखाते, पद्माकर मानकर, चतुर सिंद्राम आदींनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहीका बोलावून अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णांची तपासणी डॉ. अभय थुल, डॉ. राहुल राऊत यांनी केली. घटनेची तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक फुलकुवर व चमू करीत आहेत. अपघात झाल्यानंतर प्रवासी वाहनचालक वाहन सोडून पसार झाला असल्याची माहिती आहे.

Exit mobile version