डांगुरली शाळेच्या अग्रवाल शिक्षकाचे विद्यार्थ्याशी अश्लील वर्तणूक

0
62

गोंदिया,दि.21ःगोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगुरली येथील एका शिक्षकांने 20 फेबुवारीला शाळेतील दोन विद्यार्थीनींच्या अश्लिल चाळे करुन गैरवर्तणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे.यासंदर्भात सदर विद्यार्थींनी मुख्याध्यापकासह पालकांकडे सदर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर मुख्याध्यापक तेजराम बोहणे यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली,मात्र अद्यापही या प्रकरणात कुठलीही कारवाई संबधित शिक्षकावर वृत्त लिहिपर्यंत झालेली नव्हती. गावातील सुनिता सुयोग बिजेवार,राशी अरविंद चौरागडे,कौशल्या दसरे,राजकुमार दसरे, आदीं पालकांनी  गोंदिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना तक्रार करुन शिक्षक संजय घनश्यामदास अग्रवाल यांच्यावर कारवाई करुन शाळेतून शिक्षकाला हटविण्याची मागणी केली आहे.
माहितीनुसार इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनीसोबत सदर शिक्षकांने अश्लिल भाषेत संभाषण करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुख्याध्यापकांना देण्यात आली.त्यानंतर दोन्ही विद्यार्थीनीनी आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली.सदर प्रकरणाची माहिती गावात पोचताच पालकांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापक बोहणे यांना सदर शिक्षकावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. मुख्याध्यापक तेजराम बोहणे यांनी सदर शिक्षकाविरुध्द शिक्षणाधिकारी कार्यालयाला माहिती  देत कारवाईकरीता योग्य ते मार्गदर्शन मागविले.

दरम्यान दासगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अनुप नागपूरे यांना या प्रकरणासंदर्भात विचारणा करण्यात आली असता अशा कुठलाच प्रकार घडला नसून असभ्य वर्तणुक केल्याप्रकरणी त्यांनी ग्रामशिक्षण समितीसमोर माफीनामा लिहून दिल्याचे सांगत गावातच प्रकरण निकाली निघाल्याचे सांगितले.तसेच शिक्षकाची बदली करण्याची मागणी पालकांनी केल्याचेही सांगितले.