Home गुन्हेवार्ता वाघाच्या कातडीची तस्करी करणार्‍या सहा आरोपींना अटक

वाघाच्या कातडीची तस्करी करणार्‍या सहा आरोपींना अटक

0

जीवती-वाघाच्या कातडीची तस्करी करणार्‍या आंतरराज्यीय आरोपींना जीवती वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. येथील वनविभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई तालुक्यातील पाटागुडा येथे करण्यात आली आहे.
जीवती येथील वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाटागुडा येथे वाघाच्या कातडीची तस्करी करणारे आंतरराज्यीय काही आरोपी येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांनी तालुक्यातील पाटागुडा गावी सापळा रचून वाघाची कातडी विक्री करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता सदर वाघाची शिकार संबंधित आरोपींनी तेलंगणा राज्यातील आसिफाबादजवळच्या भागत केली आणि वाघाची कातडी तस्करी करण्याकरिता तेलंगणा सीमेवरील पाटागुडा गावात आणले. तस्करी प्रकरणी मागील तीन-चार महिन्यापासून या टोळीच्या मार्गावर असतांना २ एप्रिलला जीवती वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मुख्य वनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक मध्य चांदा श्‍वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे करीत आहेत. यावेळी एस व्ही सावसागडे, अनंत राखुंडे, के बी कडकाडे, डी ए राऊत, वनरक्षक संतोष आलाम, संजय गरमाडे, प्रदीप मरापे, बालाजी बिंगेवाड यांनी मोलाचे कार्य केले.

Exit mobile version