जळगावमध्ये बँकेवर दरोडा; 17 लाखांची रोकड लंपास, मॅनेजरच्या मांडीवर कोयत्याचे वार

0
16

जळगाव-भरदिवसा ते ही सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावमधल्या स्टेट बँकेवर दरोडा पडल्याने जिल्हा हादरला आहे. चोरट्यांनी चाकूच्या धाकाने तब्बल 17 लाखांची रोकड, सोने लंपास केले. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.कालिका माता मंदिर परिसरातील शाखेत हे थरारनाट्य घडले. सकाळी चोरट्यांनी बँकेत धुमाकूळ घातला. त्यांनी बँक व्यवस्थापक राहुल महाजन यांच्या मांडीवर कोयत्याने हल्ला करून ही रक्कम लंपास केली.

जळगावमध्ये काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. नेहमीप्रमाणे सकाळी बँक उघडली. अधिकारी, कर्मचारी वर्ग बँकेत आला. ग्राहकांचीही वर्दळ होती. बँक उघडून अर्धा तास झाल्यानंतर एक थरारनाट्य घडले. ज्यामुळे जिल्हा हादरून गेला. पोलिसांची सुद्धा मती गुंग झाली.

घड्याळात बरोबर साडेनऊ वाजले. नेमके याच वेळत स्टेट बँकेच्या या शाखेत दरोडा पडला. दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी कर्मचाऱ्यांना हत्याराच्या सहाय्याने धमकावले. त्यांना एका खोलीत कोंडले. शाखा व्यवस्थापक राहुल महाजन यांच्याकडे तिजोरीची चावी मागितली. त्यांनी नकार देताच त्यांच्या मांडीवर कोयत्याने वार केले. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी साऱ्यांचीच भीतीने गाळण उडाली.

महाजन यांच्याकडून चावी घेतल्यानंतर दरोडेखोऱ्यांनी तिजोरीकडे धाव घेतली. जवळपास 17 लाखांची रोकड घेत पोबारा केला. यावेळी त्यांनी बँकेत तारण ठेवलेले सोने सुद्धा लंपास केले. शाखा व्यवस्थापक राहुल महाजन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.धाडसी चोरीची माहिती कळताच पोलिस अधीक्षक अधीक्षक एम. राजकुमार, उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके यांनी बँकेला भेट देत पाहणी केली. श्‍वान पथकाने शोध घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.