उभ्या ट्रकला मागून आलेल्या भरधाव ट्रकची धडक; तिघांचा जागीच मृत्यू

0
10

गोंदिया,दि.31- जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई – हावडा महामार्गावर देवरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या धोबीसराड गावाजवळ नादुरुस्त असलेल्या ट्रकला अंधारातच दुरुस्त करीत असलेल्या ट्रकच्या २ चालक व १ वाहकाला मागून येणाऱ्या एका दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ट्रक चालक रोशन भीमराव सोनुने (३५) व वाहक प्रमोद नामदेवराव इंगळे (४०) दोघे रा. टाकळी – जहागीर ता. व जिल्हा अमरावती, चालक अनवरखान अशरफ खान पठाण (२६) रा. वॉर्ड क्रमांक ३, पो. दूसरबीड ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

देवरी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणे हे नित्याचे झाले असून त्यावर आणखी भर पडली आहे. ३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी आज सकाळी ३:०० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
देवरी शहरा लगत असलेल्या धोगीसराड राष्ट्रीय महामार्गावर वाहन क्रमाकं – एम.एच. ३४- बी.जी.५०७४ ह्या ट्रक वाहनात बिगाड आल्याने वाहन दुरुस्ती करीता महामार्गाच्या एका कडेला उभे करण्यात आले होते. या वाहनाच्या वाहनचालक व वाहकाकडून दुरुस्तीचे काम सुरू असताना मागून रायपुरकडे जाणाऱ्या दिशेने येत असलेल्या ट्रक क्रमांक – एम.एच.१६- सी डी ८७७७ या वाहनाने जबर धडक दिली.

या जबर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून देवरी पोलिसांनी घटना स्थळी पोहचून मृतांना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदना करीता पाठविले आहे. देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केलेला आहे. सदर घटनेचा तपास देवरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाकुचरे व पोलीस हवालदार नरेश गायधने करीत आहेत.