यवतमाळ : जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेले खुनाचे सत्र कायम आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आर्णी व पांढरकवडा तालुक्यात दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. दारूच्या नशेत सासरा शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात जावयाने काठीने डोके फोडून सासऱ्याचा खून केला. ही घटना आर्णी तालुक्यातील म्हसोला येथे गुरुवारी रात्री घडली. तर, पांढरकवडा शहरापासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या वाई फाट्याजवळ तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण करून खून करण्यात आला.इस्तारी मधुकर नेवारे (४२, म्हसोला) असे आर्णी तालुक्यातील मृताचे नाव आहेत. रवींद्र देवराव बोटरे (३२, रा. म्हसोला), असे मारेकरी जावयाचे नाव आहे. म्हसोला येथे गुरुवारी रात्री इस्तारी नेवारे हा दारूच्या नशेत घरी आला. मुलगी निकीता रवींद्र बोटरे हिला जेवण मागितले. स्वयंपाक करून जेवण देते, असे म्हणताच सासर्याने मुलगी व जायवायला शिवीगाळ करणे सुरू केले. त्यामुळे मुलीने स्वयंपाक घराचा दरवाजा बंद केल्याने दरवाजाला लाथा मारणे सुरू केले. दरवाजाला लाथा का मारता, असा जाब विचारल्याने दोघांत वाद झाला. संतप्त जावयाने सासर्याच्या डोक्यात लाकडी काठीने मारल्याने तो जागीच गतप्राण झाला. आर्णी पोलिसांनी रवींद्र बोटरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. फरार जावयाला पोलिसांनी आज शुक्रवारी दाभडी-म्हसोला शेतशिवारातून अटक केली.