गोंदिया, ता. ७ :; जिल्ह्यातील महसुल विभागाला हादरवणारी मोठी घटना मंगळवारी (ता. ७ ) घडली असून गोरेगावचे तहसीलदार किसन के.भदाणे यांच्यासह नायब तहसीलदार जी.आर.नागपुरे व एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणाची कारवाई अगोदर गोरेगाव तहसील कार्यालयात करण्यात आली. या नंतर या सर्व जणांना पुढील तपास कारवाईकरिता गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार आहे. यात गोरेगावचे तहसीलदार किशन के. भदाणे, नायब तहसीलदार जी.आर.नागपुरे व एक खासगी व्यक्ती राजेंद्र गणवीर या तिघांवर ७,१२,१३,(१), (अ ) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.