नागपूर : शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले आहे. यातूनच एमडी पावडर विक्रीस नकार देणाऱ्या एक युवकाला पिस्तूल दाखवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर याच तस्करांनी जवळच राहणाऱ्या दुसऱ्या युवकाच्या घराला आग लावली. या दोन वेगवेगळ्या घटना सीताबर्डीत शुक्रवारी उघडकीस आल्या.मृणाल गजभिये (२८) रा. आनंदनगर, सीताबर्डी, अमन मेश्राम (२९) रा. सोमवारी क्वार्टर, निखिल सावडिया (२४) रा. टेकडी लाईन, सीताबर्डी अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी यश तिवारी (२८) रा. फूल मार्केट, सीताबर्डी हा एका मोबाईलच्या दुकानात काम करतो. काही दिवसांपूर्वी मृणालने त्याला एमडी पावडर विक्री करण्यास सांगितले. मात्र, यशने स्पष्ट नकार दिला. यावरून चिडलेल्या आरोपीने त्याला महिन्याकाठी दहा हजार रुपये खंडणी मागितली. यशची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. आरोपीच्या धमकीमुळे यश घाबरला. शुक्रवारी मृणाल, अमन आणि निखिल हे तिघेही त्याच्या घरी गेले व शिवीगाळ केली. यशने खिडकीतून बाहेर पाहिले असता मृणालजवळ पिस्तूल दिसले. त्यामुळे यश बाहेर पडला नाही. आरोपींनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली व ते निघून गेले.
नंतर हे तीनही आरोपी जानकी कॉम्प्लेक्स जवळ राहणारे वेदांत ढाकुलकर (२४) यांच्या घरासमोर गेले. एका वाहनातून पेट्रोल काढले व घरावर पेट्रोल ओतून घराला आग लावली. जवळच राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकाने प्रसंगावधान राखून आग विझवली. या प्रकरणी दोन्ही फिर्यादींच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी तिघांनाही अटक केली.
कारागृहातून सुटताच पुन्हा सक्रिय
कुख्यात मृणाल गजभिये हा चार दिवसांपूर्वीच मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. मृणालवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, काही पोलिसांचे त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे कारवाई होण्यापूर्वीच त्याला माहिती मिळते. त्याच्याकडे शस्त्र कुठून आले, याचा शोध घेणे गरजेचे आहे. मृणालने एप्रिल महिन्यात एमडी तस्करीच्या वादातून जैनुल आबुद्दीन या गुन्हेगारावर गोळी चालविली होती. यात मृणालला अटक करण्यात आली होती व त्याची रवानगी तुरुंगात झाली होती.