हिंगोलीच्या बिडिओवर अकोल्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल…

0
430

अकोला,दि.१६ः मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे बिडिओ(गट विकास अधिकारी) म्हणून कार्यरत असलेले लिंबाजी बारगिरे यांच्यावर अकोल्यातील रामदासपेठ पोलिस ठाण्यात आज दुपारी विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या अकोला पंचायत समिती मध्ये सदरहू महिला ग्रामसेविका  कार्यरत असताना तिला प्रभारी गट विकास अधिकारी लिंबाजी बारगीरे ह्याने वारंवार अश्लील हातवारे,इशारे केलेत, वेळोवेळी फोन करून अश्लील वार्तालाप देखील केली.अनेकदा काहीही कारण नसताना कार्यालयात बोलावून नको त्या ठिकाणी शारीरिक स्पर्श करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमुद आहे.मनमानी सहन न केल्यास नोकरी संपवून टाकण्याची देखील  धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हिंगोली जिल्ह्यात बदली झाल्यावर सुद्धा सतत फोनवर अश्लील संभाषण करून “मी तुझ्या विभागीय चौकशीत मदत करतो व चौकशी करणाऱ्या मॅडमला मॅनेज करतो”,असे म्हणून तू मला अकोल्याला भेटायला ये,मी तुझे काम करून देतो.असे म्हणायचा.दिनांक.१५/६/२०२४ ला तिच्या विभागीय चौकशीच्या कामात मदत करण्याच्या निमित्ताने बिडीओ बारगिरेने सदरहू महिलेला अकोला रेल्वे स्टेशन चौकात भेटायला बोलावले,व भेट झाल्यावर “तू माझ्या सोबत हॉटेलवर चल आपण मजा करू,तू मला खूप आवडते,व शारीरिक संबंध करायचे आहेत,तू येत नसशील तर मी चौकशीत मदत करणार नाही,”असे म्हटल्याचे तक्रारीत आहे.

त्यानंतर तिला स्टेशन चौकातील एका हॉटेल मध्ये जेवायला नेल्यावर त्याठिकाणी सुद्धा नको त्याठिकाणी स्पर्श करुन विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.त्यानंतर त्याने मित्राच्या लॉजवर जायचे म्हंटले असता “मीच स्वतःला सावरून त्याला म्हंटले की आपण लॉजवर न जाता मैत्रिणीकडे जावू,त्यानंतर ऑटोत बसल्यावर त्याने माझे शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श करून विनयभंग केल्याचे” सांगून ऑटो सरळ पोलिस ठाण्यात आणून तक्रार दिली आहे.

रामदास पेठ पोलिसांनी सदरहू महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.मात्र त्यावेळी फिर्यादी सोबत आरोपी देखील असताना त्याला पोलिसांनी अटक का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये फक्त ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे,इतर कलमे का लावली नाहीत ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.